कोविड-19 महामारीमुळे संपुर्ण जगाचा थरकाप उडाला असून आता एका लहानशा प्राण्याकडे बोट दाखविले जात आहे. हा विषाणू रात्री वावरणाऱ्या सस्तन प्राण्यामार्फत संक्रमित झाला असावा याबाबतचा संशय वाढत आहे. ईबोला, सार्स, एमईआरएस यासारख्या पुर्वी उद्भवलेल्या महामारींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वटवाघुळाशी संबंध होता. प्रत्येक वटवाघुळ किमान दोन प्रकारच्या विषाणूंना आश्रय देते. काहीवेळा, हे विषाणू थेट माणसांमध्ये संक्रमित होतात आणि काही वेळा इतर मध्यस्थ प्राण्यांच्या माध्यमातून संक्रमित होतात. नवा कोरोना विषाणू अशाच प्रकारे संक्रमित झाल्याचे मानले जाते. वटवाघुळे असा जीवघेणा विषाणू कसा स्वतःमध्ये साठवू शकतात? रोगकारक घटकांच्या प्रसारात त्यांचे कितपत योगदान आहे? मनुष्यासाठी ते लाभदायी आहेत का? या सर्व प्रश्नांवर विचार करण्याची गरज आहे. आतापर्यंत बहुतांश महामारीचे रोग प्राण्यांमार्फत संक्रमित झाले आहेत. अशा रोगांना झोनोटिक आजार (प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होणारे आजार) म्हणतात. संशोधकांनी असा शोध लावला आहे की वटवाघुळे 60 पेक्षा अधिक विषाणूंना आश्रय देऊ शकतात.
ताण किंवा जखमेमुळे आपला स्नायू फाटण्याची शक्यता असते कारण पेशींना होणारी दुखापत. परिणामी, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा स्नायू पुर्ववत करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करते. या प्रक्रियेदरम्यान, आपल्याला स्नायूला वेदना, सूज किंवा ताप यासारखी लक्षणे आढळण्याची शक्यता आहे. पेशींना झालेली दुखापत भरुन काढण्यासाठी शरीरात नैसर्गिकपणे ही प्रक्रिया घडून येते. काही प्रकरणांमध्ये आपली रोगप्रतिकारक यंत्रणा गरजेपेक्षा अधिक जास्त प्रमाणात प्रतिसाद (ओव्हररिअॅक्ट) देऊ शकते. परिणामी, न्युमोनियासारखी जीवासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कोविड-19 च्या प्रकरणात असेच होत आहे. यासंदर्भात वटवाघुळे युनिक आहेत. हवेत तरंगत राहण्यासाठी एका मिनिटात त्यांना शंभरवेळा आपले पंख फडफडविणे आवश्यक आहे, यामुळे त्यांच्या स्नायूंना सहज दुखापत होऊ शकते. परंतु त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीला ही दुखापत भरुन काढण्याची सवय असते. वटवाघुळांना याचा नैसर्गिक फायदा असतो कारण त्यांची रोगप्रतिकारक यंत्रणा गरजेपेक्षा अधिक प्रतिसाद देत नाही. काही वटवाघुळांमध्ये ही यंत्रणा कायमच विषाणूंचा सामना करण्यासाठी सज्ज असते. जरी यंत्रणा विषाणूशी लढा देत नाही, तरी या सस्तन प्राण्याला कोणताही धोका पोहोचविण्यापासून प्रतिबंध घालते. यामुळे वटवाघुळे ही रोगप्रतिकारकांचे सर्वोत्कृष्ट आश्रयस्थान असतात. याचाच अर्थ असा की, वटवाघुळांना विषाणूचा कसालाही धोका नाही. विषाणूंना दुसरे आश्रयस्थान मिळेपर्यंत ते वटवाघुळांच्या शरीरात आश्रय घेतात.
वटवाघुळे कमी वेळात मोठ्या अंतरावर उडू शकतात. उड्डाणादरम्यान ते एखाद्या पक्षी किंवा प्राण्याचा चावा घेऊन किंवा मल-मूत्र विसर्जित करुन विषाणूचा प्रसार करु शकतात. स्पर्श, शिकार किंवा सेवनामुळे वटवाघुळे मोठ्या प्रमाणावर सांसर्गिक असू शकतात. म्हणजेच, जोपर्यंत मनुष्यप्राणी जाणूनबुजून वटवाघुळांच्या संपर्कात येत नाहीत तोपर्यंत ते विषाणू संक्रमित करीत नाहीत. 2002 साली सार्स विषाणू वटवाघुळातून सिव्हेट्समध्ये संक्रमित झाला होता. चिनी वेट मार्केट्समध्ये (मांस व भाजीपाल्याची पदार्थांची बाजारपेठ) वन्यप्राण्यांच्या सुमारे 120 प्रजाती आहेत. यामध्ये मोर, वटवाघुळे, हरिण आणि खारींचा समावेश आहे. त्यांना पिंजऱ्यात ठेवले जाते. ग्राहकांच्या विनंतीवरुन त्यांची कत्तल केली जाते. चीनमध्ये एकूण 20,000 वन्यजीव पैदास केंद्रे आहेत. एकट्या वुहान बाजारपेठेत 1,000 मांसाची दुकाने आहेत. अशाच एका वेट मार्केटमधून नवा कोरोना विषाणू बाहेर आला असावा, असे वृत्त आहे. भूतकाळात सार्स विषाणू हा सिव्हेट कॅट्स या महागड्या खाद्यपदार्थातून माणसांमध्ये संक्रमित झाला होता. नवा कोरोना विषाणूदेखील अशाच प्रकारे माणसाच्या संपर्कात आल्याचा संशय आहे.
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी वटवाघुळांना मारुन टाकू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वटवाघुळांची महत्त्वाची भूमिका आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने ते मौल्यवान आहेत. अन्न पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटक आणि कृतकांची ते शिकार करतात. याशिवाय, अन्नाच्या शोधात असताना वटवाघुळे मोठ्या भागावार फळांच्या बिया विखुरतात. कोविड-19 ने जगभरात भयावह रुप धारण केल्याने लोक कदाचित वटवाघुळांचा अधिवास नष्ट करुन टाकतील, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांना वाटत आहे. हैदराबादमधील 100 किलोमीटर त्रिज्येत वटवाघुळांच्या 16 प्रजाती आहेत. एकट्या तेलंगणमध्ये वटवाघुळांच्या 18 प्रजाती आहेत. साधारण 1990 पर्यंत हैदराबादच्या गोवळकोंडा किल्ल्यात 12,000 वटवाघुळांची मोठी कॉलनी होती. हा आकडा आता 4,000 वर घसरला आहे.
नैसर्गिक समतोल बदलण्याच्या चीनचा प्रयत्न चांगलाच उलटला असून यामुळे लाखो लोकांच्या प्राणांची किंमत मोजावी लागली आहे. 1958 साली चीनने माओ झेंडोंग यांच्या नेतृत्वाखाली फोर पेस्ट्स कॅम्पेन (चार कीटकांविरुद्ध मोहीम) सुरु केले होते. या चार पेस्ट्समध्ये मलेरियासाठी जबाबदार डास, प्लेग पसरविणारे उंदीर, हवेतून आजार पसरविणाऱ्या माशा आणि पिकांचा नाश करणाऱ्या चिमण्यांचा समावेश होता. यापैकी सर्वाधिक फटका चिमण्यांना बसला. एवढंच नाही तर, चिनी नागरिक पोलंडच्या दुतावासात आश्रय घेतलेल्या चिमण्यांना घाबरवण्यासाठी एकत्र आले. अधिकाऱ्यांनी नकार दिला तरीही लोकांनी आग्रह धरला आणि संपुर्ण इमारतीला ड्रम्सचा घेराव घातला. दोन दिवस सातत्याने होणाऱ्या ड्रमच्या आवाजाने इमारतीमधील चिमण्या मरण पावल्या. 1960 पर्यंत चिनी नेतृत्वाचे मत बदलले होते. त्यांचा अंदाज चुकला होता. मोठ्या प्रमाणावर चिमण्यांची हत्या केल्याने प्रत्येक वर्षात त्यांचे उत्पन्न कमी होत गेले. टोळांच्या संख्येत वाढ झाली. इतर नैसर्गिक आपत्तींमुळे 1959 ते 1961 दरम्यान किमान 1.5 कोटी लोक मृत्यूमुखी पावले. बिघडलेला समतोल साधण्यासाठी चीनला सोव्हिएत युनियनकडून 2.5 लाख चिमण्यांची आयात करावी लागली. हे सर्व अनुभव डोळ्यासमोर ठेऊन, कोविड-19 च्या भीतीने वटवाघुळांचा नाश होऊ नये, असे मत पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा : कोरोनापूर्वी या महामाऱ्यांनी हादरवले होते जगाला...