हैदराबाद - भारताच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या पूर्व कंटेनर टर्मिनल(इटीसी) प्रकल्पातून अंग काढून घेण्याचा श्रीलंका सरकारने निर्णय घेतला असून भारताची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना छुप्या पद्धतीने रोखून धरण्याचा चीन कसा प्रयत्न करत आहे, याचे हे आणखी एक उदाहरण आहे.
श्रीलंकेत महिंदा राजपक्षे मैत्रिपाल सिरीसेना यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका फ्रीडम पार्टीमधून(एसएलएफपी) फुटून वेगळे झाल्यावर, २०१८ मध्येच सिरिसेना आणि रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारच्या काळात भारत, जपान आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो बंदरात इसीटी प्रकल्प उभारण्याचा करार करण्यात आला होता. अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी एसएलएफपीबरोबर हात मिळवणी केल्यानंतर तिन्ही भागीदार देशांमध्ये भागीदारीचा करार करणे शक्य झाले होते.
मंत्रिंमंडळाच्या एका बैठकीत, विक्रमसिंघे यांनी जेव्हा इसीटीचा प्रकल्प अद्ययावत करण्यासाठी परकीय गुंतवणुकीच्या आवश्यकतेबाबत जोरदार बाजू मांडली, तेव्हा विक्रमसिंघे आणि सिरिसेना यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली होती. हा करार मूलतः श्रीलंकेत चीनचा आर्थिक प्रभाव कमी करण्याच्या आणि श्रीलंकेचा जास्तीत जास्त फायदा होण्याच्या उद्देष्याने होता. जर हा भागीदारी करार यशस्वी झाला असता तर, श्रीलंकेकडे शंभर टक्के प्रकल्पाची मालकी राहिली असती आणि त्याच्या कार्यचालनातील ५१ टक्के वाटाही लंकेचाच राहिला असता. चिन आणि श्रीलंका यांचा सहभाग असलेल्या इतर प्रकल्पांमध्ये, आशियातील सर्वात मोठे आर्थिक साम्राज्य म्हणून गणला जाणारा चीन आपला वाटा वाटा सिंहाचा राहिल, याची दक्षता घेतो.
मात्र, इसीटी प्रकल्पावरील त्रिपक्षीय कराराविरोधात राजपक्षे बंधुंनी सातत्यपूर्ण मोहिम चालू ठेवली आणि त्यांनी या प्रकल्पाविरूद्ध जोरदार टीका करून त्याला अगदी खलनायक ठरवले. इतकेच नाही तर त्यामुळे २०२०च्या निवडणुकांमध्ये विरोधकांपेक्षा त्यांचे पारडे जड राहिले. कोलंबो बंदरातील भोळ्याभाबड्या कामगारांना त्यांनी इसीटी कराराविरोधात जोरदार आंदोलन करायला चिथावणीही दिली. हा प्रकल्पविरोध हा राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचाराचा एक भाग बनला होता. तसेच आमचा पक्ष सत्तेवर आल्यास आम्ही हा करार रद्द करून घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. राजपक्षे सत्तेवर आल्यावर भारतासाठी या बेटवजा देशात अनेक गोष्टी अवघड बनणार आहेत, हे अगदी स्पष्ट झाले होते.
इसीटी प्रकल्प हा कोलंबो आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलच्या अगदी जवळ असल्याने चीनच्या डोळ्यात खुपत होता. कारण कोलंबो बंदराच्या या प्रकल्पात चीनची श्रीलंकेशी भागीदारी असून चीनचा वाटा सर्वाधिक ८४ टक्के म्हणजे १ अब्ज ४० कोटी अब्ज डॉलरचा आहे.
शेजारच्या देशांमध्ये चीनने आपली लुडबुड कशी वाढवली आहे आणि त्याही पलिकडे, इतर देशाच्या हितांची कशी पायमल्ली करत आहे, हे समजून घेणे महत्वाचे ठरते. चीनचा सर्वात व्यापक असा बेल्ट अँड रोड्स प्रकल्प आणि तदनुषंगाने येणारे सागरी व्यापारी मार्ग तयार करण्याचा उद्देष्य रस्त्यांचे जाळे तयार करून त्याद्वारे आशिया, युरोप आणि त्यापलिकडे चिनचा आर्थिक तसेच राजकीय प्रभाव आणखी वाढवण्याचा आहे.
चीनला आपली उद्दिष्टे कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागू नये, या पद्धतीने पूर्ण करायची आहेत. भारताचा आकार आणि भूराजकीय परिस्थिती पहाता, चीनच्या विस्तारवादाच्या धोरणात भारत मूलभूतपणेच संभाव्य आव्हान देणारा देश ठरतो. म्हणूनच, चीन सर्वत्र भारताचा पाठलाग करत असतो आणि राष्ट्राला आर्थिक फटका बसावा, या उद्देष्याने भारताचे विकास प्रकल्पांचे गाडे घसरावे, यासाठी प्रयत्न करत असतो.
इसीटी प्रकल्पाव्यतिरिक्त, चबाहर-झेहेदन रेल्वे मार्गाबाबतही, चीनने भारताला या प्रकल्पातून बाजूला ठेवावे, यासाठी इराणी नेतृत्वाची गुप्तपणे भेट घेऊन भारताला काही काळ धक्का दिला होता. हा रेल्वेमार्ग इरकॉन या इराणच्या बांधकाम कंपनीमार्फत निर्माण केला जाणार होता. मात्र, श्रीलंकेंप्रमाणे, इराणने भारतासाठी सर्वच पर्याय बंद केलेले नाहीत. प्रत्यक्षात, डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन अध्यक्षपदावरून मानहानीकारक गच्छंती झाल्यावर चबाहर बंदरावरील भारताच्या हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत.
चीनचे फूट पाडण्याचे धोरण
राजपक्षे बंधु यांनी स्वतःचा पक्ष श्रीलंका पोदुजना पेरामुना(एसएलपीपी किंवा पिपल्स फ्रंट) स्थापन केल्यानंतर त्यांचा बुद्धिस्ट-सिंहली वांशिक जमातींमध्ये जनाधार प्रचंड वाढला आहे. नव्या पिपल्स फ्रंटने श्रीलंकेतील इतर दोन प्रमुख पक्ष-श्रीलंका फ्रीडम पार्टी(एसएलएफपी) आणि युनायटेड नॅशनल पार्टी(यूएनपी) यांना राजकीय परिदृष्यावरून जवळपास संपवून टाकले आहे.
महिंदा राजपक्षे यांची श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून अगोदरची कारकिर्द ही एसएलपीएफच्या कोटयातून असली तरीही, त्यांचे लहान बंधु गोताबाया यांनी, चीनच्या आशिर्वादाने, राजपक्षे यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी, स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा शहाणपणाचा विचार केला. अन्यथा, महिंदा राजपक्षे त्यांच्या युद्धगुन्ह्यांतील कथित सहभागासाठी आता गजाआड डांबले गेले असते. राजपक्षे आणि त्यांचे बंधु पूर्वीच्या सरकारचे निर्णय जे आपल्या हिताचे नाहित, असे वाटत होते, ते चीनला अनुकूल असे फिरवून त्याचे लाभ उठवत आहेत. श्रीलंकेसाठी आता कोणत्याही डावपेचात्मक प्रकल्पासाठी भारताला सहभागी करून घेणे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे श्रीलंकेला उपखंडातील इतर कुणी पर्यायी भागीदाराचा शोध घेणे अत्यावश्यक होऊन बसले आहे. खरेतर, इसीटीचा नाद सोडून देणे भारतासाठी शहाणपणाचा निर्णय होणार नाही. कोलंबो बंदरातील अडवलेल्या या प्रकल्पावर वाटाघाटी भारताने सुरू ठेवल्या पाहिजेत, कारण त्यामुळे भारताचे महत्व कायम चर्चेत राहील.
- बिलाल भट