औरंगाबाद : कलाग्राम परिसराजवळ पहाटे रस्त्यावरुन धावणाऱ्या भावी पोलीस अधिकारी तरुणीचा मोबाईल हिसकावलेल्या दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १ लाख ६५ हजारांचे ५ मोबाईल आणि एक मोटरसायकल हस्तगत केली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. विशाल निवृत्ती लहाने (वय २०) आणि रोहन नभाजी अंभोरे (वय २०, दोघेही रा. सावित्रीबाई फुले शाळेजवळ, माऊलीनगर, राजनगर, मुकुंदवाडी) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
मुकुंदवाडी परिसरातील रश्मी बाबासाहेब नरवडे (१९, रा. मुकुंदवाडी) ही तरुणी रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास मैत्रिणीसोबत कलाग्राम परिसरातील मॉस्को कॉर्नरपासून काही अंतरावर फोन लावण्यासाठी थांबल्या. त्यावेळी अचानक विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी दमदाटी करुन रश्मी नरवडेचा १७ हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर रश्मी नरवडेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन आज सकाळी पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुनीर पठाण, शिपाई शाहेद पटेल, दीपक शिंदे, नितेश सुंदर्डे, विक्रांत पवार यांनी विशाल लहाने आणि रोहन अंभोरेला ताब्यात घेतले. या दोघांनी सिडको, जवाहरनगर, पुंडलिकनगर आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ५ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली.