सोलापूर- शहर गुन्हे शाखेने चार संशयित चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून जबरी चोरीमधील ऐवज आणि 6 मोटार सायकली असा 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोटार सायकल चोरी व विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी करणारे चार संशयित चोर ताब्यात घेतले. पोलिसांनी 6 मोटार सायकली,1 सोन्याचे बदाम,1 मनगटी घड्याळ असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोलापूर शहर गुन्हे शाखेने विकास उर्फ विकी भीवा पवार(वय 19 रा, धोत्रेकर वस्ती, तुळजापूर नाका, सोलापूर), बसन्ना सत्तू शिंदे (27,रा न्यू शिवाजी नगर गोंधळे वस्ती सोलापूर),अक्षय राजू साबळे(वय 23 वर्ष, रा हब्बू वस्ती सोलापूर),विजय उर्फ जादू विष्णू कांबळे( वय 20 वर्ष, रा हब्बू वस्ती डेगाव नाका, सोलापूर) या संशयित आरोपीना अटक केली आहे.
विकास पवार याला अटक करून अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सोलापूर शहर, अकलूज, पंढरपूर,कामती या भागातून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली व चार दुचाकी वाहने पोलिसांच्या ताब्यात दिली.
संशयित आरोपी बसन्ना शिंदे याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शाइन मोटार सायकल चोरी केली असल्याची कबुली दिली. ती मोटार सायकल पोलिसांनी हस्तगत केली.
सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दी मध्ये एका ट्रक चालकाला लुटल्याचा गुन्हा दाखल होता,गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अक्षय साबळे व विजय कांबळे या दोघा आरोपींना अटक करून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार आरोपीना जेरबंद करत 1 जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला व 6 मोटार सायकल,1 सोन्याचे बदाम,1 मनगटी घड्याळ असा एकूण 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर,हेड कॉन्स्टेबल अशोक लोखंडे,पोलीस नाईक राजू चव्हाण,शंकर मुळे,विजय कुमार वाळके,संदीप जावळे,संतोष वायदंडे, प्रफुल्ल गायकवाड,राहुल कुंभार, विजय निंबाळकर आदींनी पार पाडली