नागपूर - क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नावाच्या संस्थेचे बनावट कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेप्रमाणेच विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर या संस्थेच्या प्रमुखासह इतर अधिकाऱ्यांच्या वाहनांवरदेखील ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ असे लिहिण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी कारवाई केली आहे.
१४ फेब्रुवारीला अजनी भागातील एका इमारतीत सीआयएचे कार्यालय स्थापित करण्यात आले होते. तपास यंत्रणेच्या नावाखाली हा गोरखधंदा सुरू करण्यात आला होता. नरेश पालारपवार असे त्या तपासण यंत्रणेचे बनावट कार्यालय स्थापनाऱ्या भामट्याचे नाव आहे. तो यवतमाळ येथील रहिवासी असून त्याच्या काही साथीदारांसोबत तो हे कार्यालय चालवत होता. या सीआयए एजन्सीचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील गौंडा जिल्ह्यात असून तेथील प्रमुखाकडूनच आपण नागपुरात कार्यालय सुरू करण्याची परवानगी घेतली असल्याची माहिती पालारपवारने पोलिसांना दिली.
या बनावट कार्यालयाची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी या कार्यालयावर धाड टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यानंतर नरेशला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रसाद सणस यांनी दिली