परभणी - घरफोडी, दुचाकी तसेच रस्त्यावरील महिलांना हिसका देऊन त्यांचे दागिने आणि पैशाची पर्स पळणारा सराईत गुन्हेगाराला परभणी पोलिसांनी जेरबंद केले. या चोरट्याला पकडल्याने शहरातील घडलेल्या चार गुन्ह्यांचा तपास लागला आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे हा चोर महिलांच्या पर्समधील पैसे, दागिने काढून घेत असे, आणि ती पर्स पुन्हा पर्समध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्या पत्त्यावर नेऊन त्या ठिकाणी फेकून देत होता.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरी, घरफोडी, जबरी चोरी तसेच उघडकीस न आलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्याचे काम निरंतर चालु असते. अशाच एका गुन्ह्यातील आरोपींचा शोधात पथकाने आरोपी बालाजी विणा माने (वय 28 वर्ष रा. संत गाडगेबाबा नगर परभणी) याला खात्रीशीर माहितीवरुन ताब्यात घेतले. त्याची पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, त्याने चार चोरीच्या गुन्ह्याची कबूली दिली.
आरोपीने शहरात दोन मोटारसायकली चोरल्या असल्याचे कबूल केले. या चोरीसह आरोपीने उड्डान पुल ते बसस्थानक रोडवर एक जोडप्याची लांबवलेली पर्सही त्याने लांबवली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, सोन्याची पोतल, खडा असलेली सोन्याची अंगठी व दुसरी साधी सोन्याची अंगठी ज्याची किंमत 38 हजार 700 रुपये इतकी आहे. ती पर्स पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी सराईत आरोपीकडून दोन मोटार सायकल व सोने, रोख रक्कम असे मिळून 1 लाख 19 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय, अपर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, पोलीस निरिक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर चट्टे, शिवदास धुळगुंड, भगवान भुसारे, हरीचंद्र खुपसे, संजय घुगे यांनी केली आहे.