परभणी - स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी फिंगर प्रिंट विभागाच्या मदतीने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर घरफोडीचा तपास कत गुन्हा उघडकीस आणून एका आरोपीस जेरबंद केले. या प्रकरणात सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. या चोरट्याला वसमत येथून जेरबंद करण्यात आले.
कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ज्यामुळे घरफोड्या, चोरीचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः कोरोनामुळे क्वारंटाईन झालेल्या कुटुंबांच्या घरावर चोरटे प्रमुख्याने पाळत ठेवून आहेत. गंगाखेड, परभणी आदी शहरांमध्ये गेल्या काही दिवसात क्वारंटाईन झालेल्या कुटुंबांच्या घरांमध्ये चोरट्यांनी हात साफ केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना परभणीच्या गंगाखेडमध्ये घडली होती.
गंगाखेडच्या मन्नाथनगरात 10 ऑगस्टला रात्री अज्ञात चोरट्याने घरफोडी करत 1 लाख 94 हजार 650 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी संजय भानुदास केंद्रे यांच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी सुरू केला. त्यांना यात अंगुली मुद्रा (फिंगर प्रिंट) विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एन. पठाण यांची मोठी मदत झाली. पठाण यांनी दाखवलेल्या तांत्रिक कौशल्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश मिळाले. त्यावरून आलेवार यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीन फारोखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे यांच्या पथकाने वसमत येथील कारखाना परिसरातील लखन भीमराव एरंडकर या आरोपीस काल (शुक्रवारी) ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून त्यास गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.