पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरतील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. थेरगाव येथे एका सोसायटीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर वाकड पोलिसांनी छापा टाकत सहा तरुणींची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे, आरोपीमध्ये दलालाचाही समावेश असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना 14 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फरजाना इस्माईल पठाण, अर्चना अजिनाथ कांबळे आणि दलाल सचिन अशोक खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथे एका सोसायटीत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्राणिल चौगुले यांना मिळाली होती. विशेष म्हणजे दोन्ही महिला आणि दलाल हा मोबाईल चॅटिंगद्वारे लोकांशी संपर्क करत असल्याचे समोर आले होते. खात्री करण्यासाठी वाकड पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला. त्यानुसार थेरगाव येथील एका सोसायटीत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालत असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी छापा टाकून सहा तरुणींची सुटका करण्यात आली. तसेच या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या फरजाना पठाण आणि अर्चना कांबळे यांच्यासह दलाल सचिन खंडागळे या तिघांना अटक करण्यात आली आहे.