रायगड : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा खटला अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्यातील आरोपीच्या आरोप निश्चिती बाबतची सुनावणी 17 जून तर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या जामिन अर्जावरची सुनावणी 20 जून रोजी ठेवण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने अश्विनी बिद्रे खटल्याचा निकाल एक वर्षात लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही सुनावणी वर्षभरात पूर्ण होणार नसून मुदत वाढीसाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.
अश्विनी बिद्रे खून प्रकरण खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश एम जे मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या वतीने आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आज सुनावणी होणार होती. ही सुनावणी २० जून रोजी ठेवण्यात आली असून आरोपीच्या आरोप निश्चितीसाठी १७ जूनला सुनावणी होणार आहे.
उच्च न्यायालयाने अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल वर्षभरात लावण्याचे आदेश दिले होते. मात्र वर्षभरात ही सुनावणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयाला पटवून देऊन मुदत वाढीसाठी अर्ज करणार असल्याचे अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले.
या खटल्यातील आरोपीने खोटे कागदपत्रे व मेसेजेस तयार केले असल्याबाबत फसवणुकीचे कलम लावले आहे. तर विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबतचे कलम ४९७ या खटल्यात वाढविले असून हे आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाला सांगितले असल्याचे अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले.