रत्नागिरी - उपअभियंता प्रकाश शेडेकर चिखलफेक व धक्काबुक्की प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह १८ आरोपींना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून सर्व आरोपींना २३ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उद्या सत्र न्यायालयात जामीनावर सुनावणी होणार आहे.
आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'च्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालून त्यांना गडनदी पुलाला बांधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांची चिखलातून धिंडही काढण्यात आली होती. या प्रकरणी शेडेकर यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून आ. नितेश राणे यांच्यासह कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण अशा १८ आरोपींना पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची म्हणजेच ९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज सुनावणीची मुदत संपल्यानंतर आरोपींना दुपारी तीन वाजता कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केली तर आरोपींच्यावतीने अॅड. उमेश सावंत, अॅड. राजेंद्र रावराणे आणि अॅड. संग्राम देसाई या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नितेश राणेंसह सर्व आरोपींना जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी अर्ज दाखल केला आहे. न्यायालय उद्या काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.