वॉशिंग्टन : रशियाच्या लढाऊ विमानाने अमेरिकेच्या हवाई दलाचे ड्रोन काळ्या समुद्रात पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या घटनेवर तीव्र आक्षेप घेत अमेरिकेने रशियाच्या राजदूताला इशारा दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने रशियाचे राजदूत अनातोली अँटोनोव्ह यांना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, रशियाच्या एसयू -27 लढाऊ विमानाने काळ्या समुद्रावर अमेरिकेचे लष्करी ड्रोन पाडले.
अमेरिकेचा रशियाला कडक संदेश : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने असेही सांगण्यात आले की, रशियातील अमेरिकेचे राजदूत लिन ट्रेसी यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला कडक संदेश दिला आहे. अमेरिकेच्या सैन्याच्या म्हणण्यानुसार, रशियन लढाऊ विमानाने मंगळवारी काळ्या समुद्रावर यूएस एअर फोर्सचे ड्रोन पाडले आणि त्याच्या प्रोपेलरचे नुकसान केले. यूएस युरोपियन कमांडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रीपर ड्रोन आणि दोन रशियन एसयू - 27 विमाने मंगळवारी काळ्या समुद्रावर आंतरराष्ट्रीय पाण्यात उडत असताना रशियन जेटने मानवरहित ड्रोन पाडले.
विमानाने ड्रोनला धडक दिली : पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट्रिक रायडर यांनी मंगळवारी सांगितले की, रशियन विमानाने ड्रोनभोवती 30 ते 40 मिनिटे उड्डाण केले आणि नंतर सकाळी 7 वाजता (मध्य युरोपीय वेळेनुसार) त्याला धडक दिली. आमचे एमक्यू - 9 विमान आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत नियमित ऑपरेशन करत होते तेव्हा त्याला रोखण्यात आले आणि हल्ला करण्यात आला, असे कमांडर जनरल जेम्स बी. हेकर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता : रशियाने युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर प्रथमच रशियन आणि अमेरिकेची लष्करी विमाने थेट संपर्कात आल्याने या घटनेकडे गांभीर्यांने पाहिले जात आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने रशियाच्या कृतीला बेपर्वा, पर्यावरणाच्या दृष्टीने अयोग्य आणि अव्यावसायिक म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बी यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मंगळवारी सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी या घटनेची माहिती दिली.