अंकारा : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा अजूनही वाढतो आहे. कोसळलेल्या इमारतींमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम अविरत सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये अजूनही मदत व बचाव कार्य सुरू आहे. आता ढिगाऱ्याखाली कोणीही जिवंत असण्याची आशा तशी कमी आहे. मदत पथके मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर लाखो बेघर लोकांना मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.
तुर्कीमध्ये 44 हजार लोकांचा मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामधील मृतांची संख्या 50,000 हून अधिक झाली आहे. भूकंपात 1,60,000 हून अधिक इमारती कोसळल्या आहेत तसेच अनेक इमारतींचे गंभीर नुकसान झाले आहे. या भूकंपात सुमारे 5,20,000 अपार्टमेंट उद्ध्वस्त झाल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आधीच सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली होती. केवळ तुर्कीमध्ये 44 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण (AFAD) ने शुक्रवारी रात्री सांगितले की, भूकंपामुळे तुर्कीमध्ये मृतांची संख्या 44,218 वर पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सीरियामध्ये 5,914 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह दोन्ही देशांतील एकत्रित मृत्यूची संख्या 50,000 च्या पुढे गेली आहे.
तुर्कीमध्ये पाच लाख घरांची आवश्यकता : तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन म्हणाले की, सरकारची प्रारंभिक योजना आता किमान 15 अब्ज खर्चात 200,000 अपार्टमेंट आणि 70,000 ग्रामीण घरे बांधण्याची आहे. अमेरिकन बँक जेपी मॉर्गनचा अंदाज आहे की, घरे आणि पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 25 अब्ज डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित आहे. एर्दोगानच्या सरकारने विध्वंस लक्षात घेऊन बांधकाम गुणवत्तेवर भर दिला आहे. मात्र, त्यांच्या कोणत्याही प्रतिक्रियेला विरोध होत आहे. त्यांच्या बचाव कामावरही टीका होते आहे.
1.5 दशलक्ष लोक बेघर : युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने म्हटले आहे की, विनाशकारी भूकंपामुळे 1.5 दशलक्ष लोक बेघर झाले आहेत. तसेच आता 500,000 नवीन घरांची गरज आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने म्हटले आहे की, ते ढिगारा साफ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी गेल्या आठवड्यात केलेल्या 100 दशलक्ष डॉलर्स मदतीपैकी 113.5 दशलक्ष डॉलर्स वापरतील.