काबूल : पवित्र इस्लामी रमजान महिन्यात अफगाणिस्तानातील प्रार्थनास्थळे आणि नागरिकांवर हल्ले थांबलेले नाहीत. पश्चिम काबूलमधील मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी शक्तिशाली स्फोट झाला. ज्यामध्ये किमान १० जण ठार तर १५ जण जखमी झाले होते.
गृह मंत्रालयाचे उप प्रवक्ते बसमुल्लाह हबीब यांनी सांगितले की, पश्चिम काबूल येथील खलिफा साहिब मशिदीमध्ये दुपारी दोनच्या सुमारास हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नमाजाच्या वेळी इमारतीत मोठा स्फोट झाला. वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की स्फोटानंतर लोकांना रुग्णवाहिकांमध्ये घेऊन जाण्यात आले. स्फोट खूप जोरदार होता. अलिकडच्या आठवड्यात झालेल्या स्फोटांमध्ये अनेक अफगाण नागरिक ठार झाले आहेत, त्यापैकी काही इस्लामिक स्टेटने घडविल्याचा दावा केला आहे.
अनेक हल्ले शिया धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. तसेच सुन्नी मशिदींवर देखील हल्ले झाले आहेत. गुरुवारी उत्तरेकडील मजार-ए-शरीफ शहरात शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या दोन प्रवासी व्हॅनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात किमान नऊ जण ठार झाले. तर गेल्या शुक्रवारी कुंदुझ शहरातील सुन्नी मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या स्फोटात ३३ जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा : Russia-Ukraine War 65th day : रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरूच