लॉस एंजेलिस Matthew Perry Death - मॅथ्यू पेरी यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी ४ वाजता घरातील एक हॉट टबमध्ये आढळून आला. घटनास्थळावर कोणतेही मादक पदार्थ आढळून आले नसल्यांच पोलिसांनी सांगितले.
1994 ते 2004 या काळात फ्रेंडस या मालिकेमुळे मॅथ्यू पेरी जगभरात लोकप्रिय ठरले. त्यांच्या विनोदी अभिनयानं त्यांचा खास चाहतावर्ग निर्माण झाला. सिटकॉममधील त्यांच्या अभिनयासाठी पेरी यांना 2002 मध्ये प्राइमटाइम एमी नामांकन मिळालं. मॅथ्यू पेरी यांनी 'स्टुडिओ 60 ऑन द सनसेट स्ट्रिप', 'गो ऑन' आणि 'द ऑड कपल' सारख्या इतर टेलिव्हिजन मालिकांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. 2003 मध्ये 'द वेस्ट विंग' आणि 2004 मध्ये जो क्विन्सीच्या भूमिकेसाठी त्यांना दोन एमी नामांकन मिळाले.
फ्रेंड्स आजपर्यंतचा सर्वाधिक लोकप्रिय शो-'फ्रेंड्स'मधून लोकप्रियता मिळविण्यापूर्वी मॅथ्यू पेरी 'हू इज द बॉस?', 'बेव्हरली हिल, 90210', 'होम फ्री' आणि इतर मालिकांमधूनही ते झळकले होते. मात्र, फ्रेंडस या मालिकेनं सर्वोच्च लोकप्रियता मिळवून दिली. या मालिके एवढे यश इतर कोणत्याही मालिकेला आलं नाही. न्यू यॉर्कमध्ये सहा मित्र राहत असतात. त्यांच्या दैनंदिन घडणाऱ्या घटनांमधून होणारी विनोदनिर्मिती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हा टीव्ही शो आजपर्यंतचा सर्वाधिक लोकप्रिय शो ठरला. मॅथ्यू पेरी यांनी काहीसा घाबरट, स्वत:चा अपमान करणारा काहीसा असुरक्षित तर काहीसा विचित्र असा चॅडलची भूमिका साकारली होती. मॅथ्यू पेरी यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.
वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन ग्रुपकडून शोक व्यक्त- मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूमागे प्राथमिकदृष्ट्या घातपाताची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, लॉस एंजेलिस पोलीस अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण शोधत आहेत. फ्रेंडस या मालिकेची निर्मिती करणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन ग्रुपनं पेरी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. त्यांनी शोकसंदेशात म्हटले, आमच्या प्रिय मित्र मॅथ्यु पेरीच्या निधनानं आम्हाला तीव्र धक्का बसलाय. मॅथ्यू हा एक अविश्वसनीय असा प्रतिभावंत अभिनेता होता. त्याची अविस्मरणीय प्रतिभा ही आमचा भाग होती. त्याच्या विनोदी प्रतिभेचा प्रभाव जगभरात निर्माण झाला. हा एक दु:खद दिवस आहे. आम्ही त्याचे कुटुंब, त्याच्या प्रियजनांना आणि त्याच्या सर्व समर्पित चाहत्यांबाबत स्नेह व्यक्त करत आहोत.