मुंबई - मुंबईच्या इंटीजर ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (Integer Travel Private Limited) काम करणाऱ्या तरुणीला थायलंडमधील फुकेट विमानतळावर ओलीस ठेवण्यात आले आहे. (Indian Hostage at Phuket Airport). या ट्रॅव्हल एजन्सीच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्याला विमानतळावर 2000 ऐवजी 2,200 थाई बहत देण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यांनी याबाबत चौकशी केली असता, गेल्या पाच तासांपासून तिला एका खोलीत कोंडून तिचा छळ करण्यात येत आहे. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्याने भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. (Vidhi Mutha detained by Immigration Office in Phuket)
पाच तास झाले बंदिस्त - इंटीजर ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएमओ वैजयंती कारी यांनी ईटीव्ही इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, ते मुंबईत एक ट्रॅव्हल कंपनी चालवतात आणि ही कंपनी देश-विदेशातील टूर आयोजित करते. या संदर्भात त्यांच्या कंपनीच्या मदतीने 20 जणांचा ग्रुप रविवारी फुकेटला जाणार होता. त्यांच्या कंपनीतील कर्मचारी विधी मुथा ही तयारी करण्यासाठी एक दिवस आधी तेथे गेली होती. परंतु तेथे सर्व कागदपत्रे बरोबर असूनही, तिला 2000 थाई बहत ऐवजी 2200 थाई बात देण्यास भाग पाडण्यात आले. याला विरोध केल्यावर तिला एका खोलीत कोंडून तिचा छळ केला. तिथे ती जवळपास पाच तास झाले बंदिस्त आहे.
जबरदस्तीने ताब्यात घेतले - इंटीजर ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएमओ वैजयंती कारी यांनी सांगितले की, कंपनीची टूर लीडर विधी मुथा (पासपोर्ट क्रमांक S2245902) यांना फुकेत येथील इमिग्रेशन कार्यालयाने विमानतळावर कोणतेही वैध कारण न देता जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि भारतात पाठवण्याची धमकी दिली. ती आज सकाळी फुकेटला पोहोचली आणि तिकडे जाण्यासाठी तिच्याकडे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, व्हिसा आणि पैसे तिच्या सोबत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी - कंपनीचे म्हणणे आहे की बेकायदेशीर वसुलीबद्दल इमिग्रेशन अधिकारी चौकशीच्या नावाखाली त्रास देत आहेत आणि तिला कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जात आहे. पीडितेने खोलीत बंद केल्यानंतर रडतानाचा व्हिडिओ देखील ईटीव्ही भारत सोबत शेअर केला आहे. इंटीजर ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएमओ वैजयंती कारी यांनी या प्रकरणात भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय आणि थायलंडच्या दूतावासाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.