लंडन Diwali 2023 : दिवाळी सण भारतातच नव्हे, तर जगभरात उत्साहात साजरा केला गेला. यावेळी भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पत्नी अक्षरा मूर्तीसोबत दिवाळी धूमधडाक्यात साजरी केलीय. तसंच त्यांनी जगभरातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जगभरातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जगभरातील नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी दीपप्रज्वल करत पत्नीचं अभिनंदनही केलं. त्यांनी 10 डाऊनिंग स्ट्रीटवरून केलेल्या भाषणात भारतीय वारशाचा उल्लेख केलाय. ते म्हणाले, "ब्रिटनतर्फे जगभरातील हिंदू तसंच शीख बांधवांना दिवाळी निमित्तानं खूप खूप शुभेच्छा." दिवाळीत दिव्यांच्या प्रकाशात चांगल्या भविष्याची अपेक्षा केली पाहिजे. पंतप्रधान या नात्यानं गोष्टी अधिक चांगल्या करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं हे प्रतीक आहे, असा माझा विश्वास आहे," असं सुनक यावेळी म्हणाले.
"तुमचे पहिले ब्रिटीश आशियाई पंतप्रधान धर्माभिमानी हिंदू आहेत. मला आशा आहे की, ब्रिटन वांशिक, सांस्कृतिक विविधतेचा हा एक अद्भुत उत्सव साजरा करत आहे." -पंतप्रधान ऋषी सुनक
अंधारावर प्रकाशाचा विजय : या आठवड्याच्या सुरुवातीला, ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयानं सोशल मीडियावर छायाचित्रं शेअर करताना लिहिलं की, आज रात्री पंतप्रधान ऋषी सुनक यांनी डाउनिंग स्ट्रीटमध्ये हिंदू समुदायाच्या पाहुण्यांचं दिवाळी निमित्तानं स्वागत केलं. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव असं फोटोत लिहलं होतं. या फोटोंमध्ये यूकेचे पंतप्रधान सुनक त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती दिवे लावताना दिसत आहेत. तसंच जगभरातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयावर विद्युत रोषणाई : सुनक यांना पंतप्रधान होऊन एक वर्ष झालंय. या आठवड्याच्या सुरुवातीला, सुनकसह त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी 10 डाउनिंग स्ट्रीट येथे दिवाळीचा एक विशेष उत्सव आयोजित केला होता, ज्यामध्ये अनिवासी भारतीय, बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. यावेळी ब्रिटनमधील पंतप्रधानांचे कार्यालय विविध फुलं, रांगोळी, मेणबत्त्यांनी सजवण्यात आलं होतं. सुनक यांनी ब्रिटनचे पहिले भारतीय पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झालं आहे.