नवी दिल्ली : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानस्थित लष्कर - ए - तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने मंगळवारी रोखला. भारत आणि अमेरिकेने संयुक्तरित्या हा प्रस्ताव आणला होता. मीरला जागतिक दहशतवादी म्हणून काळ्या यादीत टाकण्यासाठी तसेच त्याची मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी आणि शस्त्रास्त्रे प्रतिबंधित करण्यासाठी हा प्रस्ताव होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनकडून या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली होती.
अमेरिकेने 5 दशलक्ष डॉलर्सचे इनाम ठेवले आहे : मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी अमेरिकेने त्याच्या डोक्यावर 5 दशलक्ष डॉलर्सचे इनाम ठेवले आहे. जूनमध्ये, मीरला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात टाकले होते. या आधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.
मुंबई हल्यात सक्रीय सहभाग होता : मीर हा पाकिस्तातील लष्कर - ए - तोयबाचा वरिष्ठ सदस्य आहे. 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. मीर हल्ल्याच्या वेळी लष्कर - ए - तोयबाचा ऑपरेशन्स मॅनेजर होता. त्याने हल्ल्याची योजना, तयारी आणि अंमलबजावणीमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.
चीनकडून वारंवार खोडा : निंदनीय व्यंगचित्रांवरून डॅनिश वृत्तपत्रावरील हल्ला, ऑस्ट्रेलियन आण्विक आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले, शस्त्रे खरेदी करणे, फ्रान्स आणि यूएसमध्ये दहशतवाद्यांची भरती करणे, तसेच व्हर्जिनिया पेंटबॉल जिहाद प्रकरणात लष्कर - ए - तोयबाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, इत्यादी घटनांमध्ये मीरचा सहभाग आहे. पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीच्या अंतर्गत पाकिस्तान आधारित दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्यात वारंवार खोडा घातला आहे.
हे ही वाचा :