इदलिब - सीरियाने देशातील इदलिब शहरावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये तुर्की सैनिक मारले गेले. मृतांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. तर, ३६ जण जखमी झाले आहेत. हाताय प्रांताचे गव्हर्नर राहमी दोगान यांनी ही माहिती दिली. याआधी २२ सैनिक मृत झाल्याचे वृत्त होते.
'जखमींपैकी सात जणांची स्थिती गंभीर होती. त्यांचा मृत्यू झाला. आता मृतांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत,' असे दोगान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तुर्कीच्या अध्यक्षीय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगन यांनी गुरुवारी सुरक्षेसंबंधी बैठक घेतली होती. या वेळी, सुरक्षा संस्थांचे प्रमुख आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुत केवूसोग्लू उपस्थित होते.