काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान या दहशतवादी संघटनेमुळे गेली कित्येक दशके हिंसाचार सुरू आहे. अफगाण सरकार, अमेरिका अशांनी विनंती करुनही तालिबानने शस्त्रसंधीचे पालन कधीही केले नाही. यावेळी मात्र तालिबानने स्वतःच शस्त्रसंधी जाहीर केली आहे. ईद-उल-फितर निमित्त आपण तीन दिवस शस्त्रसंधी पाळणार असल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे.
"इस्लामिक अमिरातीमधील सर्व मुजाहिदीन यांना अशा सूचना देण्यात येत आहेत, की ईद हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा यासाठी देशभरातील शत्रूंविरोधातील सर्व कारवाया थांबवण्यात याव्यात. ईदच्या पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत या नियमाचे पालन करावे", अशा आशयाचे ट्विट तालिबानच्या एका प्रवक्त्याने केले आहे.
मात्र "जर 'शत्रूने' आपल्यावर हल्ला केला, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार रहा" असेही या प्रवक्त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोणताही मुजाहिदीन शत्रूच्या परिसरात जाणार नाही, तसेच शत्रूलाही आपल्या परिसरात येऊ देणार नाही." असे तो पुढे म्हणाला.
दरम्यान, काबुलमध्ये असलेल्या एका शाळेजवळ शनिवारी साखळी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सयेद-उल-शुहादा असे या शाळेचे नाव आहे. याठिकाणी एकापाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले होते. तालिबाननेही हा हल्ला आपण केला नसल्याचे स्पष्ट केले होते.
हेही वाचा : काबुलमधील शाळेजवळ बॉम्ब हल्ले; ५३ जणांचा मृत्यू