बगदाद - इराकमध्ये अमेरिकेच्या हवाई तळ परिसरात रॉकेट हल्ला झाला. उत्तर इराकमधील इर्बील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ काल सोमवारी उशिरा ही घटना घडली. या हल्ल्यात एक जण ठार झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.
इर्बील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अमेरिकी हवाई दल परिसरात तीन रॉकेट हल्ले झाले. खासगी कंत्राटदाराचा मृत्यू झाल्याची माहिती इराक आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी प्रवक्त्याने दिली. अमेरिकेचा एक जवान जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. मृत्यू झालेल्या कंत्राटदाराची माहिती अधिकाऱ्यांनी उघड केली नसून तपास सुरू असल्याचे सांगितले.
या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारली नाही. इर्बील प्रांताच्या दक्षिण भागातून हे रॉकेट डागण्यात आले. यातील काही रॉकेट नागरी भागातही कोसळले. मागील पाच महिन्यांमधील हा पहिला हल्ला आहे. इराकमधील दुतावास कार्यालये, लष्करी तळ, राजदूत यांना दहशतवाद्यांकडून अनेक वेळा लक्ष करण्यात येते. अमेरिकेने इराकमधील हस्तक्षेप टाळावा, अशी मागणी या संघटनांकडून होत आहे.