बगदाद - इराकमध्ये सरकार विरोधी निदर्शनामध्ये तीन दिवसात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे तर, दीड हजारांपेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. देशाच्या दक्षिण भागातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आंदोलनादरम्यान ठार झालेल्या ३४ जणांमध्ये ३ सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर ४२३ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. अशी माहिती मानवी हक्क आयोगाच्या सदस्याने दिली.
इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल महदी यांच्या कमकूवत सरकार विरोधात देशामध्ये आंदोलन पेटले आहे. बेरोजगारी, सरकारी सुविधांचा अभाव आणि भ्रष्टाचार सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरुन इराकचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
देशातील अराजक परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान महदी यांनी तातडीने सुरक्षेसंदर्भात बैठक घेतली. लोकांची सुरक्षा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून निर्णय घेण्यात आले. संयुक्त राष्ट्राने सरकार आणि आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच कायदा सुवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.