नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि बहरीनच्या तीन दिवसीय दौर्यावर जाणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली. या भेटीदरम्यान मोदींना 'ऑर्डर ऑफ जाएद' हा युएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याबद्दल आणि त्यांच्या प्रभावी नेतृत्त्वासाठी एप्रिल 2019 मध्ये त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
युएईचे संस्थापक जनक शेख जाएद बिन सुलतान अल नाह्यान यांच्या स्मृती प्रीत्यर्थद हा पुरस्कार दिला जातो. शेख जाएद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे एमईएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी २ ऑगस्टला बहरीनला रवाना होणार आहेत. यावेळी ते बहरेनचे पंतप्रधान प्रिन्स शेख खलीफा बिन सलमान अल खलीफा यांची भेट घेऊन परस्पर हितसंबंधातील प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांविषयी चर्चा करतील.