बगदाद - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इराकी बिगरलष्करी नागरिकांच्या सेनेतील 10 जणांना ठार केले. दहशतवाद्यांनी सामरा शहरात शनिवारी रात्रीतून अशा प्रकारचा नियोजित हल्ला घडवून आणल्याचे इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
कट्टरपंथीय दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामुळे देशाच्या चिंतेत भर पडली आहे. याआधी दहशतवाद्यांनी देशाच्या बऱ्याच मोठ्या भागावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते. पुन्हा एकदा तशीच स्थिती ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील काही आठवड्यांतील हा अत्यंत भयानक हल्ला होता.
इस्लामिक स्टेटशी तब्बल तीन वर्षे युद्ध केल्यानंतर इराकने 2017 साली युद्ध जिंकल्याची घोषणा केली होती. सध्या इराकी सरकार आणि तेथील अधिकारी राष्ट्रीय आर्थिक संकटाशी आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संघर्ष करत आहेत. यात आता इस्लामिक स्टेटचा युद्धानंतर मागे राहिलेला भाग डोके वर काढू लागला आहे. यामुळे मागील काही महिन्यांत इराकमध्ये अंतर्गत हल्ले होऊ लागले आहेत.
इराकमधील इस्लामिक स्टेटवर कडक कारवाई करून त्यांच्या बीमोड करण्यात बऱ्यापैकी यश आले होते. इराकी सरकार, उत्तरेकडील कुर्दीश सैन्य आणि अमेरिकन सैन्य ठरलेल्या योजनेनुसार मागे परतू लागल्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेत पोकळी निर्माण होऊ लागली आहे. याचाच फायदा घेऊन कट्टरपंथी शक्ती पुन्हा हात-पाय पसरण्याचे मनसुबे रचत आहेत.
इराकचे होऊ घातलेले पंतप्रधान मुस्तफा कधिमी यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना 'त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही', असे ट्विट केले आहे.
मागील आठवड्यात उत्तरेकडील किर्कूक शहरात एका गुप्तहेर कार्यालयावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला होता. यात तीन सुरक्षा अधिकारी जखमी झाले होते. तर, नुकत्याच झालेल्या हल्ल्यात दक्षिण तिक्रीट येथील मेकीश्फा या गावात सहा जण गोळीबारात ठार झाले. आणखी तिघे रस्त्याकडेला झालेल्या बॉम्ब हल्ल्यात मारले गेले आणि एकाला ताल-अल-दहाब या गावाजवळ गोळी घालून ठार करण्यात आले. हा हल्ला देशाची राजधानी बगदादपासून उत्तरेला 95 किलोमीटरवर झाला.