तेहरान - इराणच्या उपराष्ट्रपती मसौमेह एब्तेकर यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट 'पॉझिटिव्ह' आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
'एब्तेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली. याचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे,' अशी माहिती उपराष्ट्रपतींच्या सल्लागारांनी दिली आहे.
आतापर्यंत इराणमध्ये भयंकर कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी १०६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे गुरुवारी आढळून आले. आता येथील कोरोनाबाधितांची संख्या २४५ वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. स्थानिक वृत्तसंस्था आयआरएनएने (इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी) हे वृत्त दिले आहे.
सध्या चीनमध्ये मृतांचा आकडा सर्वांत जास्त २ हजार ७८८ वर पोहोचला आहे. चीनच्या वुहान प्रांतात प्रथम रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळली होती. येथूनच या विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली. जगभरात या प्राणघातक विषाणूचा प्रसार झाला आहे. आशियात भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये तसेच, अमेरिका, युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - दक्षिण कोरियात आणखी 334 जण कोरोनाच्या तडाख्यात, बाधितांचा आकडा 1,595 वर