जेरुसलेम : इस्राईलमध्ये एका धार्मिक स्थळावर चेंगराचेंगरी होऊन कित्येक भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (शुक्रवार) पहाटे ज्यू धर्मीयांच्या बॉनफायर फेस्टिवलमध्ये ही दुर्घटना घडली. यामध्ये १००हून अधिक लोक जखमी असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी घेतली दखल..
यानंतर देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या दुर्घटनेची दखल घेतली आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रार्थना आणि प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरवर्षी आयोजित केला जातो फेस्टिवल..
ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली, तो घुमट ज्यू धर्मीयांच्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. याठिकाणी दरवर्षी बॉनफायर फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. दुसऱ्या शतकातील संत रब्बी शिमोन बार योचाई यांच्या समाधीस्थळावर हजारो ज्यू दरवर्षी एकत्र येतात. याठिकाणी रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
स्टेडियममधील खुर्च्या तुटल्याने गदारोळ..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायऱ्यांवरुन जाणारे काही लोक घसरुन पडले. त्यानंतर त्यांच्या मागचे लोकही एकमेकांवर कोसळत गेले. तसेच, स्टेडियमच्या काही खुर्च्या तुटून खाली पडल्यामुळे लोक घाबरुन तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. या सर्व गदारोळमुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
कित्येक लोक दगावल्याची माध्यमांमध्ये माहिती..
इस्राईलमधील कित्येक माध्यमे याठिकाणी सुमारे ३० ते ४० लोक दगावल्याचा दावा करत आहेत. तर, सोशल मीडियावरही याठिकाणचे कित्येक व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत, ज्यामध्ये चेंगरले गेलेले लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मागवले हेलिकॉप्टर..
देशाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख मेगन डेविड अॅडम यांनी सांगितले, की सध्या १०३ जखमींवर उपचार सुरू आहेत. यांपैकी ३८ लोकांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी सहा हेलिकॉप्टर मागवल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्राईलमध्ये लॉकडाऊन आणि कोविड नियम हटवल्यानंतर हा पहिलाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा बॉनफायर कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.