जेरुसलेम - गाझामध्ये इस्रायल आणि दहशतवाद्यांदरम्यान दोन दिवस युद्ध चालल्यानंतर गुरुवारी युद्धविराम लागू झाला आहे. इस्रायलने मंगळवारी हवाई हल्ल्यात गाझापट्टीमधील पॅलेस्टीनी इस्लामिक जिहाद (पीआयजे) या दहशतवादी संघटनेच्या सर्वांत वरिष्ठ कमांडरपैकी अबू अल अता याला ठार केल्यानंतर ही लढाई सुरू झाली होती.
पीआयजेच्या एका प्रवक्त्याने युद्धविराम गुरुवारी सकाळी 5.30 ला लागू झाल्याचे सांगितले. दरम्यान अद्याप या वृत्ताला इस्रायलकडून दुजोरा मिळालेला नाही.
गाझामधील हमासद्वारे संचलित आरोग्य मंत्रालयाने इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात 32 पॅलेस्टीनी मारले गेल्याचे म्हटले आहे.
मध्य-पूर्वेत युनाइटेड नेशन्सचे शांतीदूत निकोलय म्लादेनोव यांनी संयुक्त राष्ट्रे आणि इजिप्तने गाझा आणि आजूबाजूच्या प्रदेशात युद्धाची धोकादायक स्थिती थांबवण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
अल-कुद्स ब्रिगेड्सने (पीआयजेची सशस्त्र शाखा) दिलेल्या माहितीनुसार, अबू अल-अता (42) आपल्या सैन्य परिषदेच्या प्रमुख सदस्यांपैकी एक असून गाझा पट्टीच्या उत्तर भागात कमांडर होता.