बगदाद - इराकची राजधानी असलेल्या या शहरातील अमेरिकेच्या दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून मिळत आहे. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आले नाही. बगदादच्या अत्यंत सुरक्षित अशा मानल्या जाणाऱ्या 'ग्रीन झोन'मध्ये एकापाठोपाठ एक अशी तीन क्षेपणास्त्रे येऊन धडकले. यानंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अमेरिकेने या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार ठरवले आहे. याआधीही ग्रीन झोनमध्ये याप्रकारे हल्ले झाले होते. या हल्ल्यांची जबाबदारी कोणीही स्वीकारली नव्हती. मात्र अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हा हल्ला इराणच्या निमलष्करी दलाने केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला होता. या हल्ल्यानंतर आखाती देशातील परिस्थिती अशांत झाली आहे. सुलेमानी याच्या मृत्यूनंतर इराणमध्ये तीन दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्याच्या अंत्यविधी दिवशीच इराक समर्थकांनी बगदादमधील अमेरिकेच्या लष्करी आणि दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. तसेच, त्यानंतरही इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ले करणे सुरू ठेवले होते. त्यावर आता आज पुन्हा एक हल्ला करण्यात आला आहे.
हेही वाचा : इराण अण्विक कराराची जागा आता 'ट्रम्प डील' घेणार?