बगदाद - इराकमधील सलाहउद्दीन प्रांतातील अमेरिकन लष्कराच्या विमानतळावर रॉकेट हल्ला झाला. ही तिन्ही रॉकेट 'कत्यूशा' श्रेणीतील असल्याची माहिती सुरक्षा दलातील सुत्रांनी दिली. बलाड विमानतळावर काल सायंकाळी हा हल्ला झाला. इराकची राजधानी बगदादपासून हे ठिकाण सुमारे ९० कि.मी दूर आहे.
अमेरिकेच्या सैन्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न -
अमेरिकेन लष्कराशी संबंधीत कंत्राटदाराकडून वापरण्यात येणाऱ्या इमारतीवर एक रॉकेट पडले. या हल्ल्यात इमारतीतील काही कर्मचारी जखमी झाले आहेत. तर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतर दोन रॉकेट हवाई तळावरील मोकळ्या जागेत पडल्याने हानी टळली. बलाड विमानतळ हे अमेरिकेच्या लष्कराकडून वापरण्यात येणारे सर्वात मोठे विमानतळ आहे. अमेरिकन लष्कराच्या मालाची साठवणूक आणि वाहतुकीसाठी याचा प्रामुख्याने वापर होतो. या ठिकाणी अमेरिकेतील अनेक लष्करी सैनिक आणि कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यामुळेच या विमानतळाला लक्ष्य करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून या विमानतळावर दहशतावादी गटांकडून सतत हल्ले होत असल्याने मोठ्या प्रमाणात सैन्य तळावरून हटवण्यात आले आहे. तीन रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारली नाही. इराकमधील अमेरिकेचे दुतावास कार्यालय आणि लष्करी तळावर दहशतवाद्यांकडून सतत हल्ले होतात.