लंडन - आयसीसी विश्वकरंडकातील अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' असे मोठ्या अक्षरात लिहिलेले डिजिटल बॅनर्स रस्त्यावरून फिरवण्यात येत आहेत. वाहनांवर आणि रस्त्यांवरही काही ठिकाणी हे बॅनर्स लावले आहेत. लॉर्डस येथील क्रिकेट ग्राऊंडच्या बाहेर असे फलक पहायला मिळत आहेत.
याआधी विश्वकरंडकातील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान हेडिंग्ले मैदानाच्या वरून जाणाऱ्या विमानातून बॅनर्स सोडून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला होता. तसेच, बर्मिंगहॅमच्या रस्त्यांवर 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' असे फलक लावले होते. लंडनमध्ये लॉर्डस स्टेडिअमवरच त्यांनी अशाच प्रकारे पाकिस्तानचा निषेध केला होता. या वेळी, पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेचा सामना सुरू होता.
विमानाच्या भरारीनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. तसेच, पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी बलुची कार्यकर्त्यांनी लावलेली पोस्टर्स फाडून टाकली. ते 'पाकिस्तानी लष्कर चिरायू होवो,' अशा घोषणाही देत होते. यानंतर आयसीसीकडून या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.
'बलोच रिपब्लिकन पार्टी आणि जागतिक बलोच संघटनेद्वारे पाकिस्तानविरोधात जागरूकता अभियान राबवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून दिवसाढवळ्या बलुची चळवळीतील कार्यकर्त्यांना नाहीसे करण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कर आणि राज्यकर्त्यांकडून कित्येक दशकांपासून बलुची नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत. याविरोधात आवाज उठवण्यासाठी या बॅनर्सद्वारे प्रचार करण्यात येत आहे,' असे बलुची संघटनांनी म्हटले होते. 'पाकिस्तानात मानवाधिकारांची होणारी पायमल्ली, तेथील अत्यंत वाईट परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी आम्ही आमचे अभियान सुरूच ठेवू,' असेही या संघटनांनी म्हटले होते. त्यानुसारच हे बॅनर्सद्वारे हे आंदोलन केले जात आहे.