लंडन - ब्रिटनच्या प्रयोगशाळांमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे, सरकारने तब्बल ५० हजार लोकांचे नमुने अमेरिकेत कोरोना तपासणीसाठी पाठवले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आज माहिती दिली. लवकरात लवकर निदान होण्यासाठी परदेशामध्ये हे नमुने तपासणीसाठी पाठवणे अत्यंत आवश्यक होते, असे देशाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या विशेष विमानांच्या मदतीने या नमुन्यांना ब्रिटनच्या स्टॅनस्टेड विमानतळावून एअरलिफ्ट करण्यात आले. या नमुन्यांची अमेरिकेत तपासणी झाल्यानंतर त्याचे अहवाल लवकरात लवकर इंग्लंडला परत पाठवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यात आले होते. शिवाय, नमुने बाहेर पाठवणे हा आपात्कालीन स्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांपैकी एक होता. ब्रिटनच्या आरोग्य विभागाच्या एका प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली.
आरोग्य विभागाचे सचिव मॅट हॅनकॉक यांनी आरोग्य विभागापुढे दररोज एक लाख नमुन्यांची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र सलग सातव्या दिवशीही ते लक्ष्य आरोग्य विभागाला गाठता आले नाही. त्यामुळे ही सरकारने आपली असमर्थता मान्य करत नमुने परदेशात पाठवण्याबाबत खुलासा केला.
युनायटेड किंगडममध्ये आतापर्यंत २,१६,५२५ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ३१,६६२ लोकांचा यात बळी गेला आहे.
हेही वाचा : अॅमेझॉनचं जंगल होतंय सपाट, अवैध लाकूडतोड आणि खाण उद्योग फोफावला