लंडन : मासिक पाळीशी संबंधित उत्पादनांवरील पाच टक्के 'व्हॅट' रद्द करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. एक जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वी ब्रिटन सरकारने शाळा-महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये ही उत्पादने मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता याबाबतीत आणखी एक पाऊल पुढे जात, या उत्पादनांवरील कर रद्द करण्यात आला आहे.
देशातील सर्व महिलांना मासिक पाळीशी संबंधित उत्पादने सहजपणे उपलब्ध व्हावीत यासाठी ब्रिटन सरकारने हा निर्णय घेतला आहे. टॅम्पॉन टॅक्स रद्द करण्याचे आमचे आश्वासन पूर्ण करताना मला आनंद होत आहे. मासिक पाळीसंबंधी उत्पादने ही अत्यावश्यक गोष्टींमध्ये येतात. त्यामुळे, त्यांच्यावरील व्हॅट रद्द करणे हा योग्य निर्णय आहे, असे देशाचे मुख्य अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सांगितले.
आम्ही यापूर्वीच शाळा-महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सॅनिटरी उत्पादने मोफत उपलब्ध करुन दिली आहेत. देशभरातील महिलांना सहजरित्या ही उत्पादने उपलब्ध व्हावीत यासाठी आम्ही आता हे आणखी एक पाऊल उचलले आहे, असेही ऋषी म्हणाले.
मार्चमध्ये केली होती घोषणा..
गेल्यावर्षी मार्चमध्ये वार्षिक अर्थसंकल्प सादर करतानाच सरकारने हा कर रद्द करण्याची घोषणा केली होती. १ जानेवारी २०२१पासून हा कर रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. ब्रेक्झिट झाल्यानंतर आता युरोपियन युनियनचा व्हॅट डायरेक्टिव्ह कर देणे ब्रिटनला बंधनकारक राहिले नाही. त्यामुळे, आता ब्रिटनने हा कर रद्द केला आहे.
कित्येक संघटनांच्या आंदोलनाला यश..
गेल्या काही वर्षांपासून कित्येक संघटना हा कर रद्द करावा यासाठी आंदोलन करत होत्या. सॅनिटरी उत्पादने या चैनीच्या गोष्टी नसून अत्यावश्यक गोष्टी असल्यामुळे त्यावर कर लावणे अयोग्य असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. त्यांच्या या लढ्याला आता यश मिळाले आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये स्कॉटलँड सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी मोफत सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. जगभरात कॅनडा, भारत, ऑस्ट्रेलिया, केनिया आणि अमेरिकेतील काही राज्यांमध्ये सॅनिटीरी उत्पादनांवर कर आकारला जात नाही. तसेच, जर्मनीमध्येही अशा उत्पादनांवरील कर कमी करण्यात आला आहे.
हेही वाचा : 2021 मध्ये अंदाजे 14 कोटी मुले जगात जन्माला येतील - युनिसेफ