मॉस्को - राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवलनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एलेक्सी नवलनी यांच्या शरिरामध्ये विष आढळले नसल्याचे ओमस्क इमर्जन्सी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. याबाबत माहिती देणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ एलेक्सी यांच्या प्रवक्त्या कीरा यारम्यश यांनी ट्विट केला आहे.
एलेक्सी नवलनी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना सायबेरिया येथील जर्मन रुग्णालयात हलवण्यास नकार दिला आहे. नवलनी सध्या कोमामध्ये आहेत. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासारखी त्यांची प्रकृती नाही, असे ओमस्क इमर्जन्सी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण ?
एलेक्सी सायबेरियावरुन मॉस्कोला परत येत असतानाच विमानामध्ये त्यांच्यावर चहामधून घातक विषप्रयोग करण्यात आल्याचे कीरा यांनी टि्वट करून म्हटलं होतं. एलेक्सी सायबेरियावरुन मॉस्कोला परत येत असतानाच चहा प्यायल्यानंतर विमानामध्ये त्यांना उटल्या आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडल्याने विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.
यापूर्वी झाला होता विषप्रयोग -
गेल्या वर्षी एलेक्सी नवलनी यांना तुरुंगवास झाला होता. तेव्हा त्यांना विषबाधा झाली होती. मात्र, डॉक्टरांनी अॅलर्जिटीक अटॅक असल्याचे सांगून पुन्हा तुरुंगात पाठवलं होतं. एलेक्सी नवलीन हे रशियामधील सरकारला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. रशियामधील भ्रष्टाचाराविरोधामध्ये लढण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली होती. मात्र, गेल्या महिन्यात हे फाउंडेशन बंद पडले आहे.
रशियामध्ये विरोधकांवर विषप्रयोग -
रशियामध्ये विरोधकांवर विषप्रयोगाची घटना पहिली नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. सोवियतची एजन्सी केजीबी जी सोविएत टुटल्यानंतर रशियाची एफएसबी झाली होती. तीचे माजी कर्नल एलेक्सजेंडर लितविनेंको हे 2000 मध्ये रशियासोबत बंडखोरी करून लंडनला गेले होते. 6 वर्षांनंतर त्यांच्या चहामध्ये रेडियोधर्मी पोलोनियम-210 मिसळवले होते. त्यानंतर ते अत्यंत आजारी पडले होते आणि तीन आठवड्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
खोजी पत्रकार अन्ना पोलितकोवस्काया 2004 मध्ये चहा पिल्यानंतर आजारी पडली होती. दक्षिण रशियामधील एका शाळेवरील हल्ला लपवण्यासाठी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा अन्ना यांनी केला होता. या घटनेच्या 2 वर्षानंतरच मॉस्कोमध्ये त्यांची गोळी मारून हत्या केली होती.