मॉस्को - रशियामध्ये रविवारी कोरोनाने कहर केला. एका दिवसामध्ये देशात तब्बल १०,६३३ रुग्णांची नोंद करण्यात आली. ही २४ तासांमध्ये नोंद झालेली आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे रशियातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,३४,६८७ वर पोहोचली आहे. देशाच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.
रशियाच्या एका वृत्तवाहिनीने सांगितल्याप्रमाणे, ३० एप्रिलनंतर रशियामधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे. यासोबतच, रविवारी रशियामध्ये ५८ बळींची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या १,२८० झाली आहे. तर आतापर्यंत १६,६३९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
देशातील सर्वाधिक फटका बसलेल्या मॉस्कोमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ५,९४८ रुग्ण आढळून आले आहेत. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांमध्ये असे समोर आले आहे, की मॉस्कोच्या एकूण लोकसंख्येपैकी (१२.६८ दशलक्ष) दोन टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. शहराचे मेयर सर्जे सोब्यानिन यांनी याबाबत माहिती दिली.
त्यामुळे देशातील परिस्थिती आजिबात स्थिर नसल्याचे कबूल करत, रशियाच्या आरोग्य विभागाने लोकांना आवाहन केले आहे, की त्यांनी खबरदारीच्या उपायांचे पालन करावे.
हेही वाचा : माझ्या मृत्यूनंतरची आकस्मिक योजना सरकारकडे तयार होती; ब्रिटनच्या पंतप्रधानांचा खुलासा