मास्को - कोरोनासाठी अधिकृतरित्या लस मंजूर करणारा रशिया जगातील पहिला देश ठरला आहे. रशियाने तयार केलेली लस 1 जानेवारी 2021 मोठ्या प्रमाणात सामूहिक लसीकरणासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी नोंदवलेल्या प्रमाणपत्रात नमूद केली आहे. दरम्यान रशियाला लसीच्या 1 अब्जपेक्षा जास्त डोसच्या खरेदीसाठी रशियाला विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. पाच देशांमधील परदेशी भागीदारांसह 500 दशलक्षपेक्षा जास्त डोसचे उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी रशिया तयार आहे.
लसीचे उत्पादन झाल्यानंतर सर्वांत अगोदर लस डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होईल, असे रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले. तसेच रशियन लसीची परदेशात मागणी असून आम्हाला 20 राज्यांतून लसीच्या 1 अब्जपेक्षा जास्त डोसच्या खरेदीसाठी प्राथमिक विनंत्या मिळाल्या आहेत. रशिया आपली उत्पादन क्षमता आणखी वाढवण्याच्या विचारात आहे, असे दिमित्रीव्ह म्हणाले.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला असून याची मानवी चाचणी उत्तमरित्या पूर्ण केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या लसीची पहिली चाचणी आपल्या मुलीवर केल्याची माहिती त्यांनी दिली. लस निर्मितीच्या प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या मानवी चाचणीत सर्व रुग्णांवर त्याचा प्रभाव दिसला असून रोगप्रतीकारक शक्ती वाढल्याचा दावा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.