मॉस्को : नाझी जर्मनीवरील विजय दिनानिमित्त आज रशियामध्ये 'व्हिक्टरी परेड'चे आयोजन करण्यात आले होते. खरेतर हा विजय दिन ९ मे रोजी साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याबाबतची दरवर्षी होणारी परेड पुढे ढकलण्यात आली होती. व्हिक्टरी दिनाचा यावर्षी ७५वा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला.
'रेड आर्मी'- ज्यामुळे रशियाने नाझी जर्मनीवर विजय मिळवला होता; ती नसती तर आज जगाचे काय रुप असते हे कल्पनेपलीकडील आहे असे मत यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी व्यक्त केले. आपल्याच लोकांनी एका भयानक युगाचा अंत केला होता, आणि हेच अंतिम सत्य आहे. आपण हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही सांगायला हवे, असेही पुतीन यावेळी म्हणाले. सोव्हिएत संघामधील जवान आणि नागरिक मिळून साधारणपणे २७ दशलक्ष लोकांचा या युद्धामध्ये बळी गेला होता.
यानिमित्त रेड स्क्वेअरवर पार पडलेल्या परेडमध्ये साधारणपणे १४ हजार जवान सहभागी होते. यामध्ये सोव्हिएत संघातील माजी सदस्य मंगोलिया आणि सर्बिया देशातील जवानांच्या तुकड्याही होत्या. यावेळी रशियन लष्करातील २३०हून अधिक वाहनांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी दुसऱ्या महायुद्धातील टी-३४ टँक, टोपोल इंटरकॉंटिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल-लॉंचर्स, हेलिकॉप्टर्स, बॉम्बर्स आणि लढाऊ विमानांचा समावेश होता.