लंडन : ऑक्सफोर्ड विद्यापीठाने आपल्या शब्दकोशामध्ये काही नवीन बदल केले आहेत. यामध्ये महिला (वुमन) या शब्दाच्या व्याख्या, आणि त्याचे समानार्थी शब्दही बदलण्यात आले आहेत. कित्येक दिवसांपासून याबाबत शब्दकोशावर टीका केली जात होती. त्यानंतर गेल्या वर्षी महिला शब्दाच्या व्याख्येमध्ये बदल करण्याबाबतची मागणी करणारी एक ऑनलाईन याचिका व्हायरल झाली होती. ३० हजारांहून अधिक लोकांनी या याचिकेवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आता विद्यापीठाने हे बदल केले आहेत.
काय केले बदल..
महिला शब्दाच्या व्याख्येमध्ये यापूर्वी "पुरुषाची पत्नी, किंवा पुरुषाची प्रेयसी" असा उल्लेख होता. यात बदल करुन, "एखाद्या व्यक्तीची पत्नी, एखाद्या व्यक्तीची प्रेयसी" असे करण्यात आले आहे. असेच बदल 'पुरुष' शब्दाच्या व्याख्येतही करण्यात आले आहेत. "महिलेचा पती, प्रियकर" याऐवजी आता "एखाद्या व्यक्तीचा पती, प्रियकर" असा उल्लेख यात करण्यात आला आहे. यापूर्वी असलेले उल्लेख हे लिंगभेद दर्शवणारे होते, त्यामुळे लिंगभेदाला आळा घालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही शब्दांच्या व्याख्या 'जेंडर न्यूट्रल' झाल्या आहेत.
समलैंगिक व्यक्तींकडून स्वागत..
एलजीबीटीक्यू समुदायाच्या व्यक्तींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. एखादी महिला ही केवळ पुरुषाचीच नव्हे, तर दुसऱ्या महिलेचीही प्रियसी वा पत्नी असू शकते हे सर्वमान्य करण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे मोठे पाऊल असल्याचे या समुदायाने म्हटले आहे.
आक्षेपार्ह समानार्थी शब्द बदलले..
जुन्या आवृत्त्यांमध्ये महिला या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून 'बिच' (कुत्री) हा शब्द देण्यात आला होता. मात्र, आता बिच या शब्दाला आक्षेपार्ह शब्दांमध्ये मोडण्यात आले आहे. यासोबतच, अशा प्रकारचे इतर शब्द आणि वाक्ये ज्यामध्ये महिला या वस्तू, किंवा पुरुषांच्या मालकीच्या असल्याचा उल्लेख आहे ते सर्व नव्या आवृत्तीतून वगळण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
हेही वाचा : अमेरिकेत कोरोना विषाणू कृती दलाच्या सह-अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती; बायडेन करणार घोषणा