चीनमध्ये उगम झालेल्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. मात्र, इटलीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीमध्ये या विषाणूचे एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर सुमारे साडेबारा हजार रुग्णांचा यात बळी गेला आहे. इटलीची आरोग्य व्यवस्था ही जगात दुसरी सर्वोत्तम मानली जाते. तरीही या विषाणूचा कहर इटलीमध्ये पहायला मिळत आहे. अशा वेळी भारताने इटलीला लागलेली ठेच पाहून काय शिकावे..?
- परिस्थितीचे गांभीर्य ओळखा..
पहिली गोष्ट म्हणजे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. सध्या भारतात परिस्थिती तितकी गंभीर नाही हे खरे आहे. मात्र, तरीही आपण काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू कोणतेही लक्षण न दाखवताही एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एक ते दोन आठवडे राहू शकतो. त्यामुळे आपण 'फिट' आहोत, म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही किंवा झालेला नाही, हा गैरसमज पाळू नये.
इटलीच्या नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींनी आणि नेत्यांनीही परिस्थिती गांभीर्याने नाही घेतली. एका कार्यक्रमादरम्यान, इटलीमधील बरेच नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना आढळून आले होते. कोरोनासंबंधी संपूर्ण जगात माहिती पसरल्यानंतरची ही बाब आहे. शिवाय इटलीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही तेथील सरकारने कडक पावले उचलण्यास वेळ लावला, ज्याची फळे ते आता भोगत आहेत.
- अर्ध्या हळकुंडावर पिवळे होऊ नका..
कोरोना विषाणूशी लढा द्यायचा असेल तर त्यासाठी अपुरे उपाय अवलंबून काहीच फायदा होणार नाही. संपूर्ण देशात म्हणजेच अगदी जिथे विषाणू पोहोचला नाही तिथेही खबरदारीचे उपाय लागू करणे आवश्यक आहे.
इटलीने सुरूवातीला देशात ज्या-ज्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले, त्या भागांना रेड झोन घोषित केले. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये खबरदारीचे उपाय लागू करण्याऐवजी, केवळ त्या रेड झोन्सना बंद केले. त्यामुळे त्या भागांमधील लोकांनी कमी निर्बंध असणाऱ्या भागांकडे स्थलांतर करण्यात सुरू केले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होतच राहिला. त्यानंतर जेव्हा प्रशासनाला लक्षात आले, की आपल्या उपायांनी विषाणूचा प्रसार थांबत नाहीये, आणि देशातील रेड झोन्सची संख्या वाढतच आहे, तेव्हा त्यांनी देशभरात निर्बंध लागू केले.
इटलीचा अनुभव पाहता, दोन-तीन आठवड्यांसाठी संपूर्ण देशच बंद करण्याची प्रक्रिया का आवश्यक आहे, हे लक्षात येते.
- व्हेनेटोचा अनुभव..
इटलीमधील दोन शेजारी प्रांत म्हणजे लोंबार्डी आणि व्हेनेतो. लोंबार्डीची लोकसंख्या सुमारे दहा दशलक्ष आहे. यांपैकी सुमारे ३५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या प्रांतामध्ये सुमारे ५ हजार लोकांचा बळी गेला आहे. तर दुसरीकडे व्हेनेटोमध्ये लोंबार्डीच्या निम्मी म्हणजेच पाच दशलक्ष लोकसंख्या आहे. मात्र, रुग्णांची संख्या इथे तुलनेने फारच कमी आहे. व्हेनेटोमध्ये सुमारे ७ हजार लोकांना याची लागण झाली असून, सुमारे ३०० लोकांचा बळी गेला आहे.
व्हेनेटोने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या ज्या नक्कीच अनुकरणीय आहेत. व्हेनेटो प्रशासनाने कोरोनाचे संशयित असलेल्या आणि नसलेल्या सर्व लोकांची जेव्हा शक्य होईल तेव्हा तपासणी केली. त्यानंतर, जर एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्यास प्राधान्य दिले. आवश्यक त्यांना स्व-विलगीकरणात जाण्यात सांगितले.
याहीपुढे, एखाद्या व्यक्तीला आपल्याला कोरोना झाल्याचा संशय आला, तर त्याच्या घरी जाऊन त्याची तपासणी करण्यासची व्हेनेटो प्रशासनाने सुरुवात केली. तसेच, कोरोनासंबंधी उपचार करणारे डॉक्टर, नर्स, इतर वैद्यकीय अधिकारी यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आले.
इटलीचा हा अनुभव पाहता, आपल्याला त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. भारतात कोरोना सध्या फेज-२ मध्ये असला, तरी त्याचा प्रसार वाढतोच आहे. यावेळी लोकांनीही स्वतः च स्वतः ची काळजी घेणे, आणि मुख्य म्हणजे घरात राहणे आवश्यक आहे...
हेही वाचा : कोविड-१९मुळे इतर आवश्यक आरोग्य सेवांवर परिणाम नको - जागतिक आरोग्य संघटना