ड्युब्लिन : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भारताने जगभरातील कित्येक देशांना मदत केली होती. आता देशाला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला असताना, जगभरातून मदत येत आहे. आयर्लंडनेही भारतासाठी तब्बल ७०० ऑक्सिनज कॉन्सेन्ट्रेटर्स पाठवले आहेत. यासोबतच, एक ऑक्सिजन जनरेटर आणि ३६५ व्हेंटिलेटर्स पाठवण्याच्या तयारीतही आयर्लंड असल्याची माहिती आयरिश सरकारच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. शिनुआ वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली.
आयरिश सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी ज्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सची खरेदी केली होती, त्यांपैकी काही भारताला पाठवण्यात आले आहेत. देशाचे गृहनिर्माण, स्थानिक प्रशासन आणि वारसा मंत्री डॅर्राघ ओब्रायन यांनी याबाबत माहिती दिली. या महामारीत आयर्लंड भारतासोबत उभे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
भारतातील परिस्थिती पाहता, मदतीसाठी युरोपियन युनियनचे देश एकत्र होऊन पुढे आले आहेत. याचाच एक भाग म्हणून आयर्लंडकडून ही मदत पाठवण्यात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. यासोबतच, रशियाने पाठवलेले वैद्यकीय साहित्यही बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यामध्ये २० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स, ७५ व्हेंटिलेटर्स, १५० बेडसाईड मॉनिटर्स आणि २२ मेट्रिक टन औषधांचा समावेश आहे.
हेही वाचा : रशियाहून पाठवलेले वैद्यकीय साहित्य देशात दाखल; पाहा व्हिडिओ..