जिनिव्हा - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 लाख 31 हजार 706 वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत 82 हजार 80 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 2 हजार 150 रुग्ण पूर्णत: बरेदेखील झाले आहेत.
संपूर्ण अमेरिकेमध्ये 11 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 70 जण कोरोनाबाधित आहेत. तर अमेरिकेतील एकट्या न्युयार्कमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 731 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. कोरोचा प्रसार झाल्यापासून एका दिवसात होणाऱ्या मृत्यूचा सर्वांत मोठा आकडा आहे. तर एकूण मृत्यू हे 5 हजार 489 झाले आहेत.
इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 39 नविन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ईटलीमध्ये एकूण 1 लाख 35 हजार कोरोनाबाधित आढळले असून 16 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 1 लाख 41 हजार 942 कोरोनाबाधित असून 14 हजार 45 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा उगम झाल्यापासून चीनमधील नव्या रुग्णांची आणि बळींची संख्या झपाट्याने वाढत होती. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र चीनमधील कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचा दर एकदम कमी झाला होता. तरीही काही प्रमाणात नवे रुग्ण आणि बळी आढळणे सुरूच होते. मंगळवारी मात्र चीनमध्ये कोरोनाचा एकही नवा बळी आढळून आला नाही. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा एकही स्थानिक नवा रुग्ण देशात आढळून आला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.