जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 6 लाख 34 हजार 835 वर पोहचली आहे. तर 29 हजार 957 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये जगभरामधून 63 हजार 159 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 3 हजार 464 जणांचा मृत्यू झाला आहे. ताज्या माहितीनुसार युरोपमध्ये सर्वांत जास्त 3 लाख 61 हजार कोरोनाबाधित आहेत. त्यात इटलीमध्ये 92 हजार, स्पेनमध्ये 72 हजार,जर्मनीमध्ये 52 हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. इटलीमध्ये 10 हजार 23 आणि स्पेनमध्ये 5 हजार 690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकाही प्रभावित झाला असून तेथे 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
कोरोना महामारीने हजारो नागरिक जीवास मुकले असून यामुळे जगभरातील 195 देश प्रभावित आहेत. चीनच्या वुहान प्रांतात प्रथम या विषाणूचा प्रादुर्भाव झाला. येथूनच या विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली. जगभरात या प्राणघातक विषाणूचा प्रसार झाला आहे. आशियात भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये तसेच, अमेरिका, युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे.