पॅरिस - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. सध्या फ्रान्समध्ये 24 लाख 9 हजार 62 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 59 हजार 361 जणांचा बळी गेला आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुस्लीम धर्माबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जगभरातील मुस्लिमांनी टीका केली होती. अनेक मुस्लीम देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाली होती.
काय म्हणाले होते फ्रान्सचे राष्टाध्यक्ष ?
फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला होता. व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅक्रान यांनी माफी मागण्यास नकार दिला. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लीम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. मॅक्रान यांनी व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे समर्थन केले होते.
जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
जगभरामध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांनी 7 कोटी 45 लाख 60 हजार 962 आकडा गाठळा आहे. तर 16 लाख 55 हजार 758 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. 5 कोटी 23 लाख 95 हजार 275 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिका, भारता, ब्राझिल, रशिया आणि फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.
बड्या राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण -
अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे. इंग्लडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना 27 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. प्रिन्स चार्ल्स, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो, रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन, अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती.
हेही वाचा - जगातील 'या' बड्या राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण