नवी दिल्ली : भारत, बांगलादेश आणि नेपाळसारख्या पूरग्रस्त दक्षिण आशियाई देशांना युरोपियन युनियनने मदत जाहीर केली आहे. १.६५ दशलक्ष युरोंची मदत देण्याची घोषणा युनियनतर्फे करण्यात आली आहे.
यापूर्वी युरोपियन युनियनने अम्फान आणि इतर वादळांच्या तडाख्यात नुकसान झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १.८ दशलक्ष युरोंची मदत केली होती. यानंतर आता युरोपियन युनियनने केलेल्या एकूण मदतीची रक्कम ३.४५ दशलक्ष युरोंवर पोहोचली आहे.
दक्षिण आशियामध्ये येणाऱ्या मान्सूनच्या पावसाने यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या मदतीमुळे आमच्या सहकारी राष्ट्रांना आपापल्या देशातील नागरिकांसाठी तातडीने काहीतरी उपाययोजना करता येईल, असे मत ताहीनी थाम्मन्नागोडा यांनी म्हटले. आशिया आणि पॅसिफिकमधील युरोपीयन युनियनच्या मानवतावादी कामाचे नियोजन ते पाहतात.
साधारणपणे १७.५ दशलक्ष लोकांना या पुराचा फटका बसला आहे. कित्येक घरे, पिके, शाळा, रुग्णालये आणि रस्ते यांमुळे वाहून गेले आहेत. युरोपियन युनियनने दिलेल्या माहितीनुसार, १.६५ दशलक्ष युरोंपैकी एक मिलियन युरो हे बांगलादेशमधील पूरग्रस्तांसाठी नियोजित असणार आहेत. तसेच, पाच लाख युरो हे भारतातील पूरग्रस्तांसाठी असणार आहेत. तर, दीड लाख युरो हे नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी असणार आहेत.
युरोपियन सिव्हिल प्रोटेक्शन आणि मानवतावादी कार्यक्रमांमधून युरोपियन युनियन दरवर्षी सुमारे १२० दशलक्ष लोकांची मदत करते.