बर्लिन : युरोपातील जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या थैमानात आतापर्यंत 150 हून अधिक नागरिकांचा बळी गेला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुराच्या तडाख्याने या देशांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रहिवासी भागातील घरे, इमारतींसह रस्ते, पूल, शेतपिके आणि नैसर्गिक साधन संपत्तीचेही या पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अख्खे घर पुरात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, पूरग्रस्त भागात बचाव मोहीम राबविली जात आहे.
जर्मनीत सर्वाधिक बळी
पश्चिम जर्मनीतील पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या अह्रवीलर कौंटीत पुराने 90 जणांचा बळी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा आकडा वाढण्याची भीतीही यंत्रणांनी व्यक्त केली आहे. तर शेजारील उत्तर ऱ्हाईन-वेस्टफॅलिया राज्यात 43 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेल्जियमची प्रसारण संस्था आरटीबीएफच्या वृत्तानुसार बेल्जियममध्ये पुराने 27 जणांचा बळी घेतला आहे.
जर्मन राष्ट्रपतींनी केली हवाई पाहणी
जर्मनीचे राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमीयर यांनी शनिवारी पुराचा तडाखा बसलेल्या भागाची हवाई पाहणी करत बचावकार्याचाही आढावा घेतला. पुरामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून दूरसंचार यंत्रणाही कोलमडली आहे. त्यामुळे मृत्यूचा खरा आकडा यापेक्षाही कैकपट जास्त असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणहून नागरीक बेपत्ता असल्याचे वृत्त मिळत असून त्यांचा शोध घेण्याचे काम बचाव पथकांद्वारे केले जात आहे. पुराचा तडाखा बसलेल्या भागात बचाव मोहीम राबविली जात असून बचाव पथकाकडून नागरिकांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जर्मनीतील वासेनबर्ग टाऊनमधील रुर नदीला आलेल्या पुरानंतर इथून सुमारे 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
नेदरलँडसह स्वीत्झर्लंडलाही फटका
जर्मनी आणि बेल्जियमसह नेदरलँडच्या दक्षिण भागालाही पुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. याशिवाय स्वीत्झर्लंडमध्येही अतिवृष्टीमुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. इथेही पूरस्थितीचा धोका वर्तविला जात आहे.
हा ग्लोबल वॉर्मिंगचाच दुष्परिणाम, तज्ञांनी खडसावले
युरोपमधील या महाभयंकर पूरस्थितीनंतर तज्ञांकडून यासाठी हवामान बदलच कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. तज्ञांकडून सातत्याने इशारा दिला जात असतानाही त्याकडे धोरणकर्ते आणि राज्यकर्त्यांकडून दूर्लक्ष केले जात आहे. हवामानातील तीव्र टोकाचे बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमधील सहसंबंध निर्विवाद असून आपल्याला यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज आहे असे ब्रुसेल्स विद्यापीठातील प्राध्यापक विम थिएरी यांनी म्हटले आहे. पोटसडॅम विद्यापीठातील सागरी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन रॅह्मस्टॉर्फ यांनीही तीव्र टोकाच्या हवामानाचा थेट ग्लोबल वॉर्मिंगशी संबंध जोडताना अमेरिका आणि कॅनडातील अतीतीव्र उष्णतेच्या लाटेचे उदाहरण दिले.
हेही वाचा - सायबेरियात गायब झालेले रशियन विमान सापडले, सर्व प्रवासी सुखरूप