रोम - शनिवारी एकाच दिवसात तब्बल ८८९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे इटलीमधील कोरोनाच्या बळींची संख्या दहा हजारांच्या वर गेली आहे. देशाच्या नागरी सुरक्षा विभागाने याबाबत माहिती दिली.
कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला देश म्हणजे इटली. अमेरिकेमध्ये जरी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असले, तरी इटलीमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. तसेच, या देशात कोरोनाचा प्रसारही अगदी झपाट्याने होतो आहे. शनिवारी एकाच दिवसात इटलीमध्ये सुमारे सहा हजार नवे रुग्ण आढळून आले. त्यामळे देशातील कोरोना बाधितांची संख्या ९२,४७२ झाली आहे.
शुक्रवारी इटलीमध्ये एका दिवसातील सर्वाधिक म्हणजेच ९६९ बळी गेले होते. त्या तुलनेत शनिवारी गेलेल्या बळींची संख्या कमी असली, तरी ती दिलासादायक नक्कीच नाही.
इटलीमध्ये लागू असलेले लॉकडाऊन हे ३ एप्रिलला संपत आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते यापुढेही कित्येक आठवडे देशातील लॉकडाऊन सुरू ठेवावे लागणार आहे.
हेही वाचा : कोरोना युद्ध: 'पंतप्रधान केअर फंड' स्थापन, मदत करण्याचे मोदींचे आवाहन