रोम - कोरोना विषाणू सध्या जगभरातील १००हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी या विषाणूला 'पॅन्डेमिक' म्हणजेच जगभरात पसरलेला साथीचा रोग घोषित केले आहे.
कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. या विषाणूचा वाढता प्रसार, आणि त्याला थांबवण्यासाठी होत असलेले निष्फळ प्रयत्न पाहता आम्ही कोव्हिड-१९ या विषाणूला जागतिक महामारी घोषित करत आहोत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेसुस यांनी दिली. ते जिनिव्हामध्ये माध्यमांशी बोलत होते.
अजूनही या विषाणूचा प्रसार आपण रोखू शकतो. आपापल्या देशांमध्ये नागरिकांच्या तपासण्या करा, रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवा आणि त्यांच्यावर उपचार करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, जगभरात या विषाणूचे १,२१,७५७ रुग्ण आहेत, तसेच ४,३८९ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत ६६,९८८ लोक यामधून बरे झाले आहेत.
हेही वाचा : कोरोनाचा हाहाकार : इराणमध्ये एका दिवसात ६३ जणांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या ३५४ वर..