लंडन - ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे 24 तासांत 696 मृत्यू झाले. ही 5 मेपासूनची सर्वाधिक आकडेवारी आहे. यासह देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता वाढून 56 हजार 533 झाली आहे. तर, 18 हजार 213 लोकांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 15 लाख 57 हजार 7 पर्यंत वाढली आहे.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या वृत्तानुसार, 'ख्रिसमसच्या काळात निर्बंध कमी करण्यात येतील, असे सांगून ब्रिटिश सरकारने 'कोविडच्या आगीत इंधन टाकण्याचे काम' केले आहे,' असा इशारा काही वैज्ञानिकांनी दिला आहे.
हेही वाचा - चीनमध्ये कोरोनाचे १२ नवे रुग्ण सापडले, सर्व विदेशातून आलेले
केंब्रिज विद्यापीठाचे डेव्हिड स्पीगलहॉल्टर यांनी या आठवड्याच्या सुरूवातीला टाइम्स रेडिओला सांगितले की, निर्बंध बदलल्यामुळे अधिकाधिक लोकांना ख्रिसमसमध्ये भेटण्याची परवानगी दिली जाईल. असे झाले तर हे संक्रमण आणखी तीव्र बनेल.
मंगळवारी ब्रिटिश कॅबिनेट कार्यालयाचे मंत्री मायकेल गव्हल यांनी ख्रिसमसच्या 5 दिवसांत 3 कुटुंबे एकत्र येण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली. त्यानुसार 23 ते 27 डिसेंबरपर्यंत 3 कुटुंबे खासगी घरात, पूजास्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी बाहेर भेटू शकतात.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी सांगितले की, 2 डिसेंबर रोजी इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेले लॉकडाऊन संपेल. यानंतर याचे नियम अधिक कडक केले जातील. ते या आठवड्याच्या शेवटी कोणते क्षेत्र कोणत्या पातळीवरील लॉकडाऊनमध्ये राहील, हे जाहीर करतील. सध्या येथे 1 महिन्याचा लॉकडाऊन सुरू आहे.
हेही वाचा - अमेरिकेत कोरोनाचे बळी 2.6 लाखांवर, मार्च 2021 पर्यंत 4.7 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज