मिन्स्क : बेलारुसचे अध्यक्ष अॅलेक्झँडर लुकाशेन्को हे सहाव्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. तब्बल ८० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवत त्यांनी विजय प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे, देशभरात आंदोलने सुरू असूनदेखील एवढ्या मोठ्या बहुमताने ते निवडून आले आहेत.
देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, लुकाशेन्को यांना ८०.२३ टक्के मते मिळाली. तर त्यांचे मुख्य विरोधक स्वैतलाना त्सिखानौस्काया यांना केवळ ९.९ टक्के मते मिळाली. यामुळे विरोधकांनी मतदानाच्या आकडेवारीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
यासोबतच, मतदानाच्या दिवशी झालेल्या आंदोलनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाल्याचे काही मानवाधिकार संघटनांनी सांगितले. मात्र, सरकारने अशा कोणत्याही घटना झाल्याचे नाकारले आहे.
बेलारुसमध्ये आतापर्यंत ६८,५०० कोरोना रुग्ण आढळले असून, ५८० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ही अधिकृत आकडेवारी असून, खरी आकडेवारी यापेक्षा वेगळी असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.
लुकाशेन्को यांनी देशात लॉकडाऊन किंवा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना लागू करण्यास मनाई केली आहे. आपल्याला कोरोना झाला होता, मात्र आपण खेळाडू असल्यामुळे कोणत्याही औषधाशिवाय बरे झाल्याचा दावाही त्यांनी गेल्या महिन्यात केला होता.