नवी दिल्ली - चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने नवे नाव दिले आहे. या विषाणूपासून होणाऱ्या आजाराला COVID-१९ असे संबोधण्यात येणार आहे. असे करण्यामागे जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली आहे. त्यानुसार हे नाव देण्यात आले आहे. याआधीही काही आजार आणि विषाणूंनी जग हादरले आहे. त्यापासून धडा घेत आता एखाद्या आजाराला नाव देताना काळजी घेण्यात येते.
एखाद्या भूप्रदेशाचे, प्राण्याचे किंवा देशाचे नाव न देण्यामागील कारणे
जर एखाद्या आजाराला भूप्रदेशाचे, देशाचे, जंगलाचे नाव दिल्याने तो प्रदेश कलंकित होण्याची शक्यता असते. प्राण्यांचे नाव दिल्यानेही एखादा ठराविक प्राणीही बदनाम होऊ शकतो. असे होण्यापासून रोखण्यासाठी जागतिक निर्देशांचे पालन केले जाते. २०१५ साली याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.
भुतकाळातील आजारांपासून घेतला धडा
- झिका व्हायरस हे नाव युगांडामधील झिका जंगलावरून देण्यात आले आहे. त्याठिकाणी या विषाणूचा उगम आढळतो.
- इबोला व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराला कांगो देशातील इबोला नदीवरून नाव देण्यात आले.
- स्वाईन फ्लू हा आजार डुकरांपासून सर्वप्रथम पसरला. मात्र, नंतर त्याचे नाव एच१एन१ असे ठेवण्यात आले. २००० च्या दरम्यान मेक्सिकोमध्ये सर्वात प्रथम हा विषाणू सापडला. मात्र, स्वाईन फ्लू नाव देण्यात आल्यामुळे पोर्क (मांस) उद्योगावर परिणाम झाला होता.
- 'मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम' या आजाराला 'स्पॅनिश फ्लू' असे म्हटले जायचे. त्यामुळे एखादा भूप्रदेश आणि नागरिकांच्या समुहाबद्दल नकारात्मक मत तयार झाले. मात्र, आता स्पॅनिश फ्लू' हे नाव टाळले जाते
- त्यामुळे या उदाहरणांतून धडा घेत आजाराला नाव देण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. जे शास्त्रज्ञ एखाद्या आजाराबद्दल संशोधन करतात त्यांचे नावही आजाराला देण्यास मनाई करण्यात आली आहे.