कोलंबो - चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला श्रीलंकेत पहिला रुग्ण आढळला आहे. श्रीलंकेमध्ये असणाऱ्या एका ४३ वर्षीय चीनी महिलेला या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
चीनच्या हुबेई प्रांतातील रहिवासी असलेली ही महिला, १९ जानेवारीला पर्यटनासाठी श्रीलंकेमध्ये आली होती. आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी केलेल्या प्राथमिक चाचणीमध्ये तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या तपासणीचा अहवाल, आणि रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी बोरेल्ला येथील वैद्यकीय संशोधन केंद्राकडे पाठवण्यात आले आहेत. या संस्थेकडील अहवाल येईपर्यंत आम्ही कोरोनाच्या इतर रुग्णांवर ज्याप्रमाणे उपचार सुरू आहेत, त्याचप्रमाणे तिच्यावर उपचार सुरू ठेवणार आहोत, अशी माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे मुख्य एपिडेमिओलॉजिस्ट सुदाथ समरवीरा यांनी दिली.
या महिलेला २५ डिसेंबरला तापाची लक्षणे आढळल्यामुळे अंगोडा शहरातील संसर्गजन्य रोगांसाठी असलेल्या विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. चीनमध्ये या विषाणूच्या बळींनी शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १०६ जणांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला आहे. तर सोमवारी या विषाणूचा संसर्ग झालेले आणखी १,३०० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जवळपास चार हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे समजत आहे.
कोरोना विषाणूमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. आधीच एखादा आजार असणाऱ्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.
हेही वाचा : थायलंडच्या महिलेचा कोलकाताच्या रुग्णालयात मृत्यू; कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय..