टोकियो - इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या बेकायदेशीर कारवाया आणि वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच क्वाड नेटवर्क सतर्क झाले आहे. चीनच्या कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी चार देशांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. येत्या काही दिवसांत चीनवर चर्चा करण्यासाठी या चार देशांची बैठक होणार आहे.
लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर आशिया पॅसिफिक क्षेत्रात महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न चीनकडून सध्या सुरू आहे. दरम्यान, क्वाड देशांची बैठक प्रस्तावित असून काही दिवसांनी होणार आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनचे अतिक्रमण सुरू आहे. त्यामुळे क्वाड देशांनी चिनविरोधात कठोर भूमिक घेतली आहे. वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर तर क्वाड नेटवर्कने चीनविरोधात जास्त कडक धोरण स्वीकारले आहे. तसेच शेजारी देशांसोबत चीनचे संबंध जास्त ताणले आहेत.
जुलै २३ रोजी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ यांनी एक महत्त्वाचे भाषण दिले. चीनसोबतचे ४० वर्षांचे राजनैतिक संबंध तोडण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. अमेरिकेतील चिनी दुतावास कार्यालयांना आपला गाशा गुंडाळण्यासही अमेरिकेने सांगितले आहे. आम्ही स्वातंत्र्यप्रेमी देश चीनने त्यांची विचारसरणी बदलावी म्हणून प्रयत्न करत आहोत. चीनच्या कृतीमुळे अमेरिकेच्या लोकांना आणि विकासाला धोका निर्माण झाला आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाला बदलण्याचा आम्ही प्रयत्न करायला हवा, असे ते म्हणाले.
यावर्षी मे महिन्यापासून भारत चीनमधील संबंधही ताणले आहेत. चीनने पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीमेवर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर एकमेकांसमोर ठाकले आहे. भारताने चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी सीमेवर शस्त्रसामुग्री जमा केली आहे.
काय आहे क्वाड नेटवर्क?
चिनी प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे चार देश एकत्र आले आहेत. संपूर्ण दक्षिण चीन समुद्र चीनच्या मालकीचा असल्याचा दावा चीनने केला आहे. त्यामुळे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश क्वाड नेटवर्कमधील महत्वाचे देश आहेत. जर चीनसोबत युद्धाची वेळ आली चीनला घेरण्यासाठी क्वाड नेटवर्क मिळून काम करण्याची शक्यता आहे.